संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील यांची १० ऑक्टोबर रोजी शहरातील विभागीय क्रीडा संकुल येथे होत असलेली जाहिर सभा १४ ऑक्टोबर रोजीच्या अंतरवाली येथील सभेचा ट्रेलर असेल अशी माहिती आयोजक मराठा क्रांती मोर्चाचे विजय काकडे पाटील आणि सुनील कोटकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
विजय काकडे पाटील म्हणाले की, मराठा समाज ओबीसीच असताना मराठवाड्यातील मराठा समाजाला या ओबीसी आरक्षणापासून वंचीत ठेवून राज्यसरकार ७५ वर्षापासून अन्याय करीत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाहिर सभा होत आहे. या सभेपूर्वी छत्रपती संभाजीनगरातील सूतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुल येथे १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जरांगे यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली.
या सभेकरीता विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाकडून रितसर शुल्क भरून परवानगी घेण्यात आली. पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितलेली आहे. आज सायंकाळपर्यंत परवानगीचे पत्र मिळेल. या जाहिर सभेची तयारी पूर्ण झाली आहे. १ ऑक्टोबरपासून संपूर्ण जिल्ह्यात आणि शहरातील विविध वसाहतीमध्ये कॉर्नर बैठका घेत आहोत. या बैठकांमधून १० ऑक्टोबरच्या सभेला जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे कोटकर यांनी सांगितले.
ही विराट सीा १४ ऑक्टोबरच्या सभेचा ट्रेलर असल्याचे त्यांनी नमूद केले. जरांगे हे मराठा समाजाचे उद्योन्मुख नेते आहेत, यामुळे शासनाने त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी,अशी मागणी त्यांनी केली. यापत्रकार परिशदेला जी.के. गाडेकर, सचीन हावळे,परमेश्वर नलावडे, लक्ष्मण नवले,श्रीकांत तौर , सचिन मिसाळ आणि गणेश उगले आदींची प्रमुख उपस्थिती होती.जबिंदा लॉन्स, कडा परिसर येथे वाहनतळ१० ऑक्टोबर रोजी सभेसाठी वाहनाने येणाऱ्या समाजबांधवांसाठी जबिंद लॉन्स, बीड बायपास परिसर आणि कडा कार्यालयाच्या मैदान, जलसंधारण विभागाचे मैदान आणि हेडगेरवार रुग्णालयाजवळील सारथीच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील नागरीकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनाऐवजी पायी यावे, असे आवाहन आयोजन समितीने केले.