औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची हकालपट्टी करण्याचा ऐतिहासिक निर्णय गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यापूर्वी समांतर जलवाहिनी विरोधी कृती समितीने मनपा मुख्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केले. एमआयएमच्या नगरसेवकांनीही श्रेय लाटण्यासाठी धरणे आंदोलन करून आनंदोत्सव साजरा केला. पाच वर्षांपूर्वी समांतरच्या कराराला मंजुरी देणाऱ्या भाजपनेही फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाची विशेष सर्वसाधारण सभा सुरू होताच समांतर जलवाहिनीविरोधी कृती समितीने जोरदार धरणे आंदोलन सुरू केले. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीची हकालपट्टी करा, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. विजय दिवाण यांनी केले. धरणे आंदोलनास बुद्धिनाथ बराळ, सुभाष लोमटे, अजमल खान, अण्णासाहेब खंदारे, देवीदास कीर्तिशाही, मनीषा चौधरी, राधाकिसन पंडित, गौतम खरात, अश्फाक सलामी, रमेशभाई खंडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, दुपारी १ वाजेच्या सुमारास एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी मनपासमोर आंदोलन सुरू केले. यावेळी शहराध्यक्ष अॅड. अन्वर कादरी, शेख नदीम, सय्यद अजीम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. समांतरच्या कंपनीची हकालपट्टी केल्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सायंकाळी सर्वसाधारण सभेत निर्णय झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसह नगरसेवकांनी मनपासमोर जल्लोष केला.
मनपासमोर आंदोलन
By admin | Published: July 01, 2016 12:18 AM