नांदेड : राज्य शासनाच्या अनुदानातून आसना नदीच्या बंधाऱ्याजवळ पर्यायी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली़ या योजनेद्वारे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी मिळणार आहे़ तथापि पैनगंगा प्रकल्प विभाग या पाण्यासाठी दीड कोटींची मागणी महापालिकेला करीत आहे़ या पार्श्वभूमीवर महापौर शैलजा स्वामी यांनी सदरील पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे़ विष्णूपुरी जलाशयात अल्प प्रमाणात जलसाठा असल्याने शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी येणाऱ्या काळात अडचण निर्माण होणार आहे़ त्यासाठी आसना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ पर्यायी पाणीपुरवठ्याचे स्त्रोत निर्माण केले आहे़ ही योजना कार्यान्वित झाली असून उर्ध्व पैनगंगेच्या पाण्यावरच ही योजना अवलंबून आहे़ उर्ध्व पैनगंगेचे आरक्षित पाणी टप्याटप्प्याने नांदेडला मिळणार आहे़ मात्र त्यासाठी १ कोटी ५१ लाख रूपये मोजावे लागणार आहेत़ मनपाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने दीड कोटींची पाणीपट्टी भरणे अशक्य असल्याचे महापौर स्वामी यांनी पालकमंत्री रावते यांच्या निदर्शनास आणले़ ही रक्कम माफ करण्याचे साकडे महापौरांनी पालकमंत्र्यांकडे घातले़ (प्रतिनिधी)
मनपाकडे दीड कोटींची पाणीपट्टी
By admin | Published: March 14, 2016 12:02 AM