औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीत नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या ३ वर्षांच्या उपक्रमाकरिता ११ महिन्यांच्या करारावर आयोजित करण्यात आलेल्या कर्मचारी भरतीमध्ये रेटारेटी झाली. मनपाच्या सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त कमी पडल्यामुळे ऐनवेळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. १०० उमेदवारांना मध्ये सोडण्यात येत होते. उन्हामुळे उमेदवारांनी सर्वांना सोडण्याची मागणी केल्यानंतर गदारोळ झाला. मनपाने पिण्याच्या पाण्याची, प्रसाधनगृहाची सोय केली होती. तसेच उन्हामुळे मंडपही दिलाहोता. जॉब कंत्राटी असला तरी मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील १ हजार ३६५ महिला उमेदवारांनी ७६ जागांसाठी अर्ज केले. अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार आल्यामुळे आज मुलाखती झाल्या नाहीत. ११ रोजी सकाळी ९ वाजेपासून मुलाखती झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास तातडीने नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे भरतीप्रमुख डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आजपासून सरळ भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. एनएचएम (आॅक्झिलरी नर्स मिडवाईफ) या पदाकरिता आज अर्ज व मुलाखती घेण्यात येणार होत्या; मात्र जास्त उमेदवार आल्यामुळे उद्या मुलाखती होतील. तसेच ११ जून रोजी स्टाफ नर्सच्या २८ जागांसाठी, १४ लॅब टेक्निशियनसाठी व १४ फार्मासिस्टच्या जागांसाठी अर्ज घेतले जातील. त्यांची छाननी होऊन मेरिटनिहाय उमेदवारांच्या मुलाखती १२ जून रोजी होतील, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. बेरोजगारी वाढल्यामुळे... बेरोजगारी वाढल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांनी कंत्राटी जॉब असूनही भाग्य अजमावण्यासाठी हजेरी लावली. नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हा उपक्रम राज्यातील सर्व मनपांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालिकेच्या आराखड्यानुसार कंत्राटी कर्मचारी भरती होणार आहे. औरंगाबाद मनपाने सर्वात आधी त्या उपक्रमांतर्गत भरतीची जाहिरात दिल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार मुलाखतीसाठी आले. एकूण किती जागा?नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत मनपाला २०१७ पर्यंत आरोग्य उपक्रमासाठी शासन अनुदान मंजूर झाले आहे. शहरात नवीन ५ आरोग्य केंद्रांसाठी ११ महिन्यांच्या करारावर १५१ जागा भरण्यात येतील.पहिल्या टप्प्यात १३२ जागा थेट मुलाखतीने भरल्या जातील. ७ हजार ५०० रुपयांचे वेतन त्यासाठी असेल. वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, लेखाधिकारी, डाटा एंट्री आॅफिसर ही पदे शासनाकडून भरली जाणार आहेत. त्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे.
मनपाचा जॉब कंत्राटी; उमेदवारांची रेटारेटी!
By admin | Published: June 11, 2014 12:37 AM