औरंगाबाद : जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील जिल्ह्यात २ लाख ११ हजार बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तब्बल १ हजार ३३३ अति तीव्र तर ७ हजार २२४ मध्यम कुपोषित बालके आढळून आली. अशी माहिती जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले दिली.
कोरोना काळात ० ते ६ वयोगटांतील बालकांच्या वजन व उंची मोजण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात १७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरच्या दरम्यान ४११ पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. घरोघरी जाऊन बालकांची वजन, उंची मोजून बालकांचा शोध घेतल्या गेला. त्यात १ हजार ३३३ बालके अति तीव्र तर ७ हजार २२४ बालके मध्यम कुपोषित असल्याचे समोर आले. सप्टेंबर महिना ‘पोषण आहार महिना’ म्हणून साजरा केला जात आहे. या सर्वेक्षणात आढळलेल्या बालकांच्या पोषण आहार व महिलांत विविध उपक्रमांतून पोषणासंबंधी जनजागृती करण्यात येत असल्याचे मिरकले यांनी सांगितले.