- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : मंदीच्या परिणामामुळे मराठवाडा विभागाचे अडीच हजार कोटी रुपयांचे आयकर आणि कॉर्पोरेट कराचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याने या उद्दिष्टपूर्तीसाठी करचुकवेगिरी करणारे अनेक जण आयकर विभागाच्या रडारवर आहेत.
प्राप्त माहितीनुसार आयकर व कॉर्पोरेट टॅक्सपोटी अडीच हजार कोटींचे उद्दिष्ट मराठवाडा विभागाला देण्यात आले होते. मात्र, बाजारपेठेतील मंदीचा परिणाम एवढा झाला की, अवघे १,२०० कोटी रुपयेच आयकर विभागाला प्राप्त झाले. यामुळे केंद्र सरकारने उद्दिष्ट कमी करीत हे उद्दिष्ट २ हजार कोटी रुपयांवर आणून ठेवले आहे. आता उद्दिष्टापैकी ८०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी आयकर विभागाने कंबर कसली आहे. करचुकवेगिरी करणाऱ्यांची यादी तयार केली जात असून, येत्या काही दिवसांत त्यासंबंधी कार्यवाही होणार आहे.
आर्थिक मंदीमुळे अनेक व्यावसायिकांनी आयकर कमी भरला आहे. कॉर्पोरेट टॅक्सच्या वसुलीलाही जबरदस्त फटका बसला आहे. दरवर्षी कर वसुलीचे उद्दिष्ट १० ते २० टक्क्यांनी वाढविले जाते. चालू आर्थिक वर्षात आयकर व कॉर्पोरेट टॅक्स मिळून अवघे १,२०० कोटी रुपयेच सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. कमी झालेल्या वसुलीसाठी बाजारपेठेतील मंदीची परिस्थिती जबाबदार आहे, असे सांगितले जात आहे. देशभरात अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. आयकर विभागातील अधिकाऱ्यांचा प्राप्त झालेला अहवाल लक्षात घेऊन केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्ट कमी केले आहे.
औरंगाबाद विभागासाठी ५०० कोटींचे उद्दिष्ट कमी करून २ हजार कोटी रुपयांपर्यंत खाली आणून ठेवले आहे. यात आयकरपोटी १,१९५ कोटी, तर कॉर्पोरेट टॅक्स ८०५ कोटी रुपये, असे उद्दिष्ट आहे. ८०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी बाकी आहे. यासाठी करचुकवेगिरी करणाऱ्या व्यावसायिकांची यादी तयार करण्यात आली आहे. सध्या औरंगाबाद शहरातील ४ ते ५ ठिकाणच्या व्यावसायिकांवर सर्व्हे सुरू आहे. अशाच प्रकारचा सर्व्हे करण्यात येणार असून, येत्या काळात मराठवाड्यात धाडी टाकण्यात येणार आहेत. उद्दिष्टपूर्तीसाठी आयकर विभागाने संपूर्ण तयारी केली आहे. विविध पथके तयार करण्यात आली आहेत. कारवाईची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात येत आहे. ज्यावेळी पथकाची गाडी संबंधित व्यावसायिकाच्या दुकानासमोर येते. तेव्हा कारवाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळते की, येथे सर्व्हे करायचा आहे. पहिले सर्व्हे करण्यात येतो. जर मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी, अघोषित संपत्ती आढळून आली, तरच प्रधान आयुक्तांच्या परवानगीने त्या सर्व्हेचे रूपांतर धाडीमध्ये करण्यात येते.
विवाद से, विश्वास तक आयकर विभागाने ‘विवाद से, विश्वास तक’ ही नवीन योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत मराठवाड्यातील सुमारे २,४०० प्रलंबित प्रकरणे जी विवादात अडकली आहेत. त्या प्रकरणांत ‘वन टाईम सेटलमेंट’अंतर्गत निवारण करणे हे होय. प्रलंबित २,४०० प्रकरणांमध्ये काही प्रकरणे मागील १५ वर्षांपासून सुरू आहेत. ३१ मार्चपर्यंत ही योजना आहे. मात्र, या योजनेसंदर्भात विभागाला मार्गदर्शिका प्राप्त झाली नाही.
अग्रिम कर भरण्यास क्लाइंटला सांगण्याच्या सीएंना सूचनादोन दिवसांपूर्वी आयकर विभागाने शहरातील सीए संघटनेचे पदाधिकारी व अन्य सीएंना बोलविले होते. त्यांना सूचना देण्यात आली की, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही व्यावसायिकांवर सर्व्हे, रेड करणार आहोत. ४आपल्या क्लाइंटला सांगून ठेवा की, सेल्फ असेसेमेंट टॅक्स न भरता त्याऐवजी १५ मार्चपर्यंत अग्रिम कर भरण्यात यावा. जेणेकरून २ हजार कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करता येईल.