- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : कोरोनातून बरे झालो म्हणजे सुटलो, असा समज करून अनेक जण गाफील राहतात किंवा बरे वाटायला लागले तर कोरोनाचे उपचार अर्धवट सोडून देतात; परंतु यामुळेच फायब्रोसिस आजाराचे नवेच संकट समोर उभे राहत असून, कोरोनानंतर फायब्रोसिस होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना फायब्रोसिस होऊ शकतो, हा समज चुकीचा असून, कोरोनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा उपचारपद्धती पूर्ण न करणाऱ्या प्रत्येकालाच फायब्रोसिसचा धोका आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. फायब्रोसिस आजार म्हणजे फुुप्फुसांना होणारा संसर्ग. हा संसर्ग वाढत जाऊन कालांतराने फुप्फुसे निकामीही होऊ शकतात.
सर्दी, ताप अशी लक्षणे दिसल्यावर अनेक जण कोरोना चाचणी न करता दुखणे अंगावर काढतात. यामुळे वेळेत उपचार मिळत नाहीत आणि फुप्फुसांमधला संसर्ग वाढत जातो. यामुळेही फायब्रोसिसचा धोका वाढत चालला आहे. बीपी, मधुमेह, टीबी, न्यूमोनिया असे आजार असणाऱ्यांना आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांना कोरोनानंतर फायब्रोसिस आजार होण्याचा धोका आहे.
वृद्ध नागरिकांनी काय काळजी घ्यावीकोरोना झाला असल्यास त्याची ट्रिटमेंट अपुरी न सोडता वेळेत पूर्ण करणे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्येष्ठांप्रमाणेच प्रत्येकाने लक्षात ठेवावी. फायब्रोसिसचा धोका जेवढा ज्येष्ठांना आहे, तेवढाच प्रत्येक कोरोना रुग्णाला आहे. ज्या रुग्णांना आधीपासूनच मधुमेह, रक्तदाब आहे त्यांनी त्या आजाराची सर्व पथ्ये पाळून त्यांचा आजार नियंत्रणात ठेवावा. ज्यांना न्यूमोनिया, टीबी हे आजार होऊन गेले आहेत, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोनानंतरचे आजार टाळण्यासाठी कोरोना गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
पोस्ट कोविड सेंटरमध्ये येणारे कमीकोरोना आजारातून बरे होऊन घरी जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला १५ दिवसांनी पुन्हा तपासणीसाठी यावे, असे आवर्जून सांगितले जाते. मात्र, बहुसंख्य रुग्ण याकडे दुर्लक्ष करतात. अनेकांना काही त्रास जाणवत नाही, म्हणून त्यांना पुन्हा तपासणी करून घेणे निरर्थक वाटते, पण हे चुकीचे आहे. पोस्ट कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ५० टक्के आहे.
असा त्रास होत असल्यास सावधानश्वास घ्यायला त्रास होणे, थोडेसे श्रम झाले तरी लगेचच थकवा येणे, छातीत कफ भरल्यासारखे वाटणे, दम लागणे ही प्रामुख्याने फायब्रोसिस आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतर काही दिवस पथ्य पाळणे आणि आपल्या प्रकृतीचे बारीकसे बदलही तात्काळ ओळखणे गरजेचे आहे.
काळजी घेणे आवश्यकपूर्वी टीबी ज्यांना होऊन गेला आहे, त्यांना फायब्रोसिस होण्याचा धोका असायचा; परंतु आता कोरोना आजार होऊन गेल्यानंतरही अनेकांना फायब्रोसिसचा त्रास जाणवत आहे. आपली फुप्फुसे ही स्पंजप्रमाणे आहेत. स्पंजमध्ये पाणी भरल्यावर जसा स्पंज जड होतो, तसेच काहीसे फायब्रोसिस आजारात फुप्फुसांमध्ये संसर्ग झाल्यावर दिसून येते. कोरोनानंतर फायब्रोसिस होण्याचे प्रमाण १० ते २० टक्के आहे. त्यामुळे रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. नीलेश लोमटे, एमडी मेडिसिन, डीएम अंतरग्रंथी तज्ज्ञ
कोरोनाची आकडेवारी : औरंगाबाद जिल्हाएकूण बाधित- ४४६०९कोरोनामुक्त ४२,९०६उपचार सुरू ५२५