औरंगाबाद : शहरातील विविध भागांत उपलब्ध करून देण्यात आलेली अनेक बँकांची एटीएम सेवा रविवारी बंद राहत असल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जावे लागत आहे. येथील विविध भागांत राष्ट्रीयीकृत बँकांसह खासगी बँकांचीही एटीएम सेवा उपलब्ध आहे. त्यांच्या एटीएम मशीनची संख्या जवळपास १५० आहे. रविवार या सुटीच्या दिवशी काही एटीएम वगळता बहुसंख्य एटीएम यंत्रे बंद असतात. सिडको, रेल्वेस्टेशन रोड, नागेश्वरवाडी, खोकडपुरा परिसरासह विविध भागांत रविवारी याचा अनुभव आला. बाहेरगावी किंवा तातडीच्या कामासाठी पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना एटीएमने रिकाम्या हाताने पाठविले. दुसर्या एटीएमवर जावे लागत असल्यामुळे ग्राहकांचा वेळ वाया जात आहे. अनेक एटीएमच्या मशीनच्या स्क्रीनवर ‘दिस एटीएम इज टेम्पररली आऊट आॅफ सर्व्हिस’ असा संदेश वाचावा लागतो. काही ठिकाणी तर तेथील सुरक्षारक्षक, कर्मचारी दुरूनच ग्राहकाला एटीएम बंद असल्याचा इशारा करतात. एटीएममध्ये सुटीच्या दिवसासाठी पैसे आहेत की नाही, याची तपासणी करून तेथे व्यवस्था करावी, तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी ग्राहक करतात.
अनेक एटीएम मशिन्स रविवारी पडतात बंद
By admin | Published: May 19, 2014 1:20 AM