औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या ९ महिन्यांपासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क आहे. कोरोना दूर ठेवण्यासह इतर विषाणू, संसर्गजन्य आजारही मास्कच्या वापराने रोखता येऊ शकतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे. मास्क वापरामुळे इतर विषाणूजन्य आजार पसरण्याचा धोका कमी झाल्याचे दिसते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याविषयी विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मास्क हा आता दैनंदिन जीवनातील एक भाग बनला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव टाळण्यासाठी मदत होते. परंतु कोरोनाच्या संकटात अजूनही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर टाळत आहेत. तर काही जणांचा मास्क हा गळ्यात अडविलेला दिसतो. परंतु मास्क हा केवळ कोरोनासाठीच नव्हे, तर विषाणूजन्य आजारांसाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे मास्क वापरण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले.
मास्कने अनेक आजारांना घातला आळासर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ॲलर्जीचे रुग्णही यापूर्वी अधिक येत होते. विशेषत: धुळीच्या ॲलर्जीचे रुग्ण अधिक येत. परंतु, त्यांचीही संख्या घटली आहे. स्वाईन फ्लूचे रुग्णही येत नाहीत. सध्या कोल्ड ॲलर्जी म्हणजे थंडीमुळे काही प्रमाणात रुग्ण येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत ओपीडी सध्या जवळपास २५ टक्क्यांवर आली आहे. मास्कचा वापर फायदेशीर ठरतो, असे घाटीतील मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या.
विषाणूजन्य आजारइन्फ्लूएंजा, स्वाईन फ्लू, फ्लू, सर्दी, खोकला या विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत गेली काही महिने मोठी घट झाली आहे. मास्क वापरामुळे श्वसनाद्वारे पसरणाऱ्या आजारांना आळा बसण्यास मदत होत आहे.
बाह्यरुग्ण विभागात सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. मास्क वापर, हाताची स्वच्छता यामुळे विषाणूजन्य आजार कमी झाल्याचे दिसते.- डा. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक