औरंगाबाद : हिमोडायलिसिसची सुविधा नसणाऱ्या भारतातील ग्रामीण भागांतील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी पोटातील डायलिसिस वरदान आहे; परंतु त्यासाठीचा खर्च रुग्णांनाच करावा लागतो. जगभरातील अनेक देशांतील शासन पोटातील डायलिसिसला प्राधान्य देते. त्यामुळे तेथे त्याचे प्रमाण अधिक आहे. भारतातील रुग्णांसाठी ही सेवा विनामूल्य मिळण्यासाठी शासनाकडून प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
पेरिटोनियल डायलिसिस सोसायटी आॅफ इंडियातर्फे शहरात आयोजित तीन दिवसीय डायलिसिस तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी अमेरिकेतील तज्ज्ञ डॉ. रजनीश मेहरोत्रा, लखनौयेथील डॉ. अमित गुप्ता, डॉ. राजेश्वर चक्रवर्ती, डॉ. के. अबिरामी, डॉ. सुहास बावीकर, डॉ. समीर महाजन, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. शेखर शिराढोणकर, डॉ. प्रशांत पारगावकर, डॉ. सचिन सोनी, डॉ. उल्हास कोंडपल्ले, डॉ. तरुण जलोका, डॉ. बालसुब्रह्मण्यम, डॉ. अमित गुप्ता, डॉ. नारायण प्रसाद, डॉ. किरण एन. कुमार आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मेहरोत्रा म्हणाले, अनेक देशांमध्ये घरच्या घरी करता येणाऱ्या पोटातील डायलिसिसचे (पेरिटोनियल) प्रमाण अधिक आहे. हे तेथील सरकारच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे. प्रत्येक मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना पहिली तीन वर्षे हे डायलिसिस केले, तर अधिक परिणाम आणि फायदेशीर ठरू शकते. डॉ. अमित गुप्ता यांनी पोटातील डायलिसिसिला प्राधान्य का द्यावे, यावर मार्गदर्शन केले. चर्चासत्रात डॉ. राजेश्वर चक्रवर्ती यांनी संशोधनानुसार हिमोडायलिसिस रुग्णांसाठी मैत्रीपूर्ण नसल्याचे नमूद केले. पोटातील डायलिसिस हे हृदयमित्र आहे, तर डॉ. के. अबिरामी यांनी हिमोडायलिसिस हे हृदयासाठी योग्य असल्याचे म्हटले. डॉ. किरण एन. कुमार यांनी डायलिसिसमधील अडचणींवर मार्गदर्शन केले.
साडेपाच वर्षांत ७५० डायलिसिसडॉ. सुहास बावीकर म्हणाले, २१ वर्षांच्या वैद्यकीय सेवेत एका रुग्णाला साडेपाच वर्षांत ७५० वेळा डायलिसिस करावे लागल्याचे पाहिले. अनेक जण डायलिसिस जाणूनबुजून टाळतात. डायलिसिसदरम्यान स्वच्छतेसह अनेक जण काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम होतो. पोटातील डायलिसिस पद्धतीचा आयुष्यमान भारत कॅशलेश सेवेत समावेश झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला जात आहे.
हरिभाऊ बागडेंचे मार्गदर्शनतीन दिवसीय परिषदेचे शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले.