विजय सरवदे, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मालकीची सव्वासातशे एकर जमीन आहे. यापैकी ‘साई’ला २५० एकर जमीन दिलेली आहे. शिवाय विद्यापीठाने बँक, विद्युत विभागालाही जमीन दिलेली आहे. आता तीन अध्यासनांसाठीही प्रत्येकी १०० एकर जागेची मागणी पुढे आली आहे. दुसरीकडे काही जागा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली आहे. विद्यापीठ हे पदव्या वाटपाचे केंद्र नसून ते समाजाभिमुख नावीन्यपूर्ण संशोधनाचे केंद्र आहे, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतोय. दर्जेदार संशोधनाला प्रोत्साहन देण्याऐवजी ऊठसूठ अध्यासनांची मागणी रेटली जाते, हे या विद्यापीठाचे दुर्दैवच म्हणावे.विद्यापीठाने अलीकडच्या काळात मोकळ्या जागेवर यशवंतराव चव्हाण विद्यार्थी वसतिगृह तसेच अल्पसंख्याक मुलींसाठी रमाईबाई आंबेडकर वसतिगृहांची उभारणी केली. याशिवाय डिजिटल स्टुडिओ उभारला. विधि विभाग, शिक्षण विभाग, सेंट्रल फॅसिलिटी सेंटर, युनिव्हर्सिटी नेटवर्किंग अँड इनफॉर्मेशन सेंटर, सेंट्रल कँटीन, सामाजिकशास्त्रे विस्तारित इमारत आदींसाठीही विद्यापीठाचा मोठा परिसर गुंतवला गेला आहे. ‘साई’साठी विद्यापीठाने जमीन दिली खरी; पण त्याचा फायदा परिसरातील किती विद्यार्थ्यांना झाला हाही एक संशोधनाचा विषय आहे. ‘साई’ला देण्यात आलेली २५० एकरपैकी १५० एकर जागा परत घेण्याचा ठराव तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात झाला होता. ते सेवानिवृत्त झाले, पण अद्यापही ती जागा परत घेण्यात आलेली नाही. दुसरीकडे विद्यापीठाने नव्याने मंजुरी दिलेल्या गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास केंद्रासाठी १०० एकर जागेची मागणी पुढे आलेली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, तोच तत्त्वत: मान्य करण्यात आलेल्या विलासराव देशमुख अध्यासन केंद्र व कार्यरत असलेल्या वसंतराव नाईक अध्यासन केंद्रासाठीही प्रत्येकी १०० एकर जागेच्या मागणीचा रेटा वाढला आहे. त्यामुळे विद्यापीठासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे कुलगुरू डॉ. चोपडे हे विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी या विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवून दिले. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत शैक्षणिक करार केले आहेत. या विद्यापीठाचा विद्यार्थी दुसऱ्या देशातील विद्यापीठात जाऊन नावीन्यपूर्ण संशोधन करू शकेल, हे त्यांचे ध्येय आहे. असे असताना विद्यापीठ निधीला भुर्दंड ठरलेल्या अध्यासनांच्या पांढऱ्या हत्तीला बळकटी देण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, हे दुर्दैव म्हणावे. कोमात गेलेली अध्यासने विद्यापीठात काही अध्यासने सोडली तर उर्वरित सगळी कोमात गेलेली आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना कोमातून बाहेर काढण्याची गरज आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार अध्यासनांनी अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि विस्तार कार्य करणे गरजेचे आहे; पण अध्यासने उलट्या क्रमाने वाटचाल करीत आहेत. अध्यासनांचा सर्वाधिक भर हा विस्तार कार्यावरच राहिलेला आहे. अध्यापन आणि संशोधनाकडे अध्यासनांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ज्या हेतूने ती अस्तित्वात आली आहेत, तो हेतू साध्य करण्यासाठी अध्यासनांना दिशा देण्याचे काम कुलगुरूंना करावे लागेल.
अनेकांचा डोळा जागेवरच
By admin | Published: April 24, 2016 11:27 PM