लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत असून, त्यामध्ये भाजपच्या वाट्याला ५ जागा येणार आहेत. मराठवाडा आणि कोकण विभागात प्रत्येकी एक जागा देण्याबाबत भाजप विचार करीत असून, मराठवाड्यातून औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीडमधून भाजपमधील इच्छुकांच्या उड्यावर उड्या पडू लागल्या आहेत.औरंगाबादमधून विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड, संजय केणेकर, ज्ञानोबा मुंडे, बसवराज मंगरुळे यांची नावे चर्चेला येत आहेत. नांदेडमधून राम रातोळणीकर, श्यामकुमार शिंदे, तर परभणीतून ४ नावे आणि बीडमधून दोन नावे चर्चेत आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याशी जवळीक असलेल्यांपैकी एकाची वर्णी मराठवाड्यातून लागेल अशी चर्चा भाजपमध्ये आहे. नवख्यांना संधी मिळण्याचे संकेत निष्ठावंतांना मिळाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळ्या परीने लॉबिंग सरू केले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष खा. दानवे यांची मर्जी या निवडणुकीत किती चालणार हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे.डॉ. कराड यांना मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षपदी बसविले आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. केणेकर हे दानवे, मुख्यमंत्र्यांना रोज भेटत आहेत. मात्र, त्यांना डावलले जाईल अशी चर्चा आहे. मंगरुळे हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत प्रयत्न करीत असले तरी त्यांना एका गटाचा विरोध आहे. ज्ञानोबा मुंडे यांची मुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांच्यावर भिस्त आहे. पंकजा यांनी बीड जिल्ह्यातील राजकीय गोळाबेरीजनुसार एखादे नाव पुढे केले तर ज्ञानोबा यांना संधी मिळणे शक्य होणार नाही. खा. दानवे यांनी नांदेड जिल्ह्यातील इच्छुकांच्या बाजूने ताकद लावल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. रहाटकर यांना मध्यंतरी राज्यसभेची उमेदवारी देऊन माघार घेण्यास सांगितले. त्यामुळे केंद्रीय पातळीवरून त्यांचे नाव ऐनवेळी सुचविले जाऊ शकते.
विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपमध्ये अनेकांचे लॉबिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:26 AM
विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत असून, त्यामध्ये भाजपच्या वाट्याला ५ जागा येणार आहेत.
ठळक मुद्देराजकारण : समर्थक वाढविण्यासाठी निष्ठावंतांना डावलण्याची शक्यता