छत्रपती संभाजीनगर : चीनने जागतिक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा न लपवता उघडपणे काम सुरू केलेले आहे. त्याच्या या अतिमहत्त्वाकांक्षीपणामुळेच भारतातील लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, अंदमान व निकोबार या भूभागासह जपान, फिलिपाईन्स, इंडोनेशिया आदी देशातील भूभागही तणावग्रस्त बनल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य तथा भारत-चीन संबंधांचे भाष्यकार जयदेव रानडे यांनी केले.
विवेकानंद महाविद्यालयात संस्थापक पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तीन दिवसीय विवेकानंद व्याख्यानमालेचे गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उद्घाटन झाले. त्यावेळी जयदेव रानडे यांनी "चिनी महत्त्वाकांक्षा : भारतीय व जागतिक संदर्भ" या विषयावर संवाद साधला. विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, उपाध्यक्ष अमर शिसोदे आणि प्राचार्य डॉ.डी.आर. शेंगुळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी रानडे म्हणाले, चीनची महत्त्वाकांक्षा ही भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक पातळीवर त्यांना वर्चस्व गाजवायचे आहे. त्यांना अमेरिकेला पाठीमागे टाकून जगाचे नेतृत्व करायचे आहे. संपूर्ण जगाला दोन भागात आणि नेतृत्वात विभाजित करून चीन व अमेरिका या सशक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली नवीन जागतिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. त्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा लपून ठेवलेल्या नसल्याचेही जयदेव रानडे यांनी सांगितले. सुरुवातीला प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शेंगुळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. शर्मिष्ठा ठाकूर यांनी मानले.
२०४९ पर्यंतचे केले नियोजनचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०२७ पर्यंत सैन्यदलाचे आधुनिकीकरण, २०३५ पर्यंत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानात जागतिक आघाडी आणि २०४९ पर्यंत जगाला प्रभावित केले जाईल, अशा नेतृत्वाची निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षी नियोजन केले असल्याचेही जयदेव रानडे यांनी सांगितले.
विश्वासार्हतेचा प्रचंड अभावभारताच्या चीनसोबत असलेल्या सीमेवर शांतता राहिली किंवा नाही, हे आता सांगताच येणार नाही. सध्या परिस्थिती कठीण आहे. चीनच्या विश्वासार्हतेमध्ये प्रचंड अभाव आहे. दोन्ही देश सध्या वर्चस्वासाठी स्पर्धा करीत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर संबंध हे भविष्यकाळात संकट आणि संघर्षांचेच असतील, असेही जयदेव रानडे यांनी स्पष्ट केले.
चिनी गृहितकात होतोय बदलचीनला आपण आतापर्यंत ओळखू शकलो नाहीत. त्यांची धोरणे आणि आक्रमकता ओळखून भूमिका घ्यायला पाहिजे होती. मात्र ती न घेतल्यानंतर चीनने आपल्याविषयी 'भारत संयम बाळगेल किंवा माघार घेईल' असे गृहितकच बनवले होते. मात्र, सध्याच्या धोरणांमुळे हे गृहितक बदलत असल्याचेही रानडे यांनी सांगितले.