औरंगाबाद : महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. डिसेंबर २०१५ पासून तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी भ्रष्टाचाराला ब्रेक लावला. त्यांचा कित्ता पुढे गिरवत विद्यमान आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सफाई मोहीमच सुरू केली आहे. नियमांच्या चौकटीबाहेर एकही काम केले तर थेट घरी जावे लागेल, असा इशारा त्यांनी मागील दोन मोठ्या घटनांच्या माध्यमातून दिला आहे. मनपातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांना घरी पाठविल्यानंतर आता आयुक्तांचे पुढील टार्गेट कोण? यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.सुनील केंद्रेकर यांनी एकाही अधिकाऱ्याला नोटीस बजावली नाही. मात्र, त्यांचा प्रशासनावरील दबदबा मोठा होता. बकोरिया यांनीही पुणे महापालिकेत अशाच पद्धतीचा दबदबा निर्माण केला होता. २४ फेबु्रवारी २०१६ रोजी मनपा आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर बकोरिया यांनी काही दिवस मनपा समजून घेतली.संचालक डी. पी. कुलकर्णी यांना निलंबित केले. त्यांच्या या धाडसी निर्णयाने महापालिकेला आणि राजकीय मंडळींना जोरदार हादरा बसला होता. या हादऱ्यातून सावरण्यापूर्वीच त्यांनी गुरुवारी आणखी एक मोठा हादरा दिला. शहर अभियंता सखाराम पानझडे यांना निलंबित केले. तत्पूर्वी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना निलंबित करण्यात आले होते. याशिवाय इतर छोट्या-मोठ्या प्रकरणात काही कर्मचारीही निलंबित झाले आहेत.महापालिकेच्या दैनंदिन कारभारात थोडीही अनियमितता दिसून येताच संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा धडाका बकोरिया यांनी लावला आहे. आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी नोटिसा बजावून ठेवल्या आहेत. एका अधिकाऱ्याने कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार करून ठेवले आहेत. त्यांनाही आयुक्तांनी नोटीस बजावून आपले ‘टार्गेट’फिक्स करून ठेवले आहे. लेखापरीक्षण विभागाने या अधिकाऱ्यावर गंभीर ठपका ठेवला आहे. आता आयुक्त आपल्या टार्गेटपर्यंत कधी पोहोचतात याकडे मनपा वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवीगाळीची रेकॉर्डिंगमहापालिकेतील संघर्षजनक परिस्थितीनंतर अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये फोन रेकॉर्डिंग सुरू केले आहे. अलीकडेच काही अधिकाऱ्यांना पदाधिकारी, नगरसेवकांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.पदाधिकाऱ्यांची ही रेकॉर्र्डिंग अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे सुपूर्द केली आहे. काही नगरसेवकांकडेही आयुक्तांनी अपात्रेच्या दृष्टीने आपले ‘टार्गेट’सेट करणे सुरू केले आहे.दिवसभर सोबत संध्याकाळी नोटीसमनपा आयुक्तांच्या कार्यपद्धतीबद्दल मनपात बरेच आश्चर्य व्यक्त करण्यात येते. दिवसभर एखाद्या अधिकाऱ्यासोबत आयुक्त काम करतात. सायंकाळी घरी जाण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येते. दिवसभर सोबत काम करताना अधिकाऱ्यांना ते किंचितही जाणीवही होऊ देत नाहीत.
अनेकजण आयुक्तांच्या ‘टार्गेट’वर
By admin | Published: September 10, 2016 12:15 AM