छत्रपती संभाजीनगर : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून माजी पालकमंत्री तथा खा. संदीपान भुमरे यांनी जून-जुलै महिन्यात पत्राद्वारे काही कामांसाठी निधीच्या तरतुदीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविले; परंतु पालकमंत्री पदावर अब्दुल सत्तार यांची नियुक्ती झाल्यानंतर ती कामे होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे येत्या काळात पालकमंत्री आणि खासदारांमध्ये त्या कामांवरून निर्णय होतो की वाद, यावरून उलटसुलट चर्चा आहे. कामे थांबवून ठेवा, अशा सूचना नवनियुक्त पालकमंत्र्यांच्या यंत्रणेकडून जिल्हा नियोजन विभागाला देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
जून महिन्यात खासदार झाल्यानंतर पालकमंत्रिपदाची जबाबदारी काही दिवसांसाठी भुमरे यांच्याकडेच होती. त्या काळात त्यांनी अनेक रस्त्यांच्या कामासाठी नियाेजन विभागाला पत्रे दिली. त्या कामांना निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी जिल्हा नियोजन विभागात अनेक जण रोज हेलपाटे मारत आहेत; परंतु त्यांची कामे अद्याप मंजूर झालेली नाहीत.
७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरीजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२४-२५ या वर्षासाठी ६६० कोटींच्या तुलनेत ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चास ३ ऑगस्ट रोजी मंजुरी देण्यात आली. संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करून १५ दिवसांत प्रशासकीय मंजुरीचे आदेश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. माजी पालकमंत्री खा. भुमरे यांनी दिलेली कामे रोखली तर शिंदेसेनेच्या या दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
नियोजन विभागात गर्दीनियोजन विभागात सध्या गर्दी वाढलेली आहे. नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्या अवतीभवती अनेकांचा गराडा असल्याचे दिसते आहे. नियोजन समितीच्या बैठकीपूर्वीच १५ कोटींचे नियोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. हे नियोजन कोणत्या कामासाठी केले याचा तपशील नियोजन विभागाकडून अद्याप मिळालेला नाही. दबावामुळे वायाळ हे कुठलीही माहिती देत नसल्याची चर्चा आहे. वायाळ यांना संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
माझ्या कानावर आले नाही...कामे थांबविण्याची किंवा मंजुरी मिळत नसल्याचा प्रकार होत असल्याचे अजून तरी माझ्या कानावर आलेले नाही. माहिती घेतल्यानंतर यावर बोलता येईल.- संदीपान भुमरे, खासदार