लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ९ आॅगस्टला होणाºया मराठा क्रांती मूक मोर्चासाठी ‘मुंबईला यावंच लागतंय ’, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी शहरातून काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीतून करण्यात आले. शेकडो युवक, युवती महिलांनी स्वयंशिस्तीचे पालन करत रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.सकल मराठा समाजाच्या वतीने ९ आॅगस्टला मुंबईमध्ये मराठा क्र्रांती मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या जनजागृतीनिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोटार सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर सकाळी नऊ वाजेपासून युवक एकत्र येताना दिसून आले. युवतींची संख्याही लक्षणीय होती.सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅलीस शिस्तीत सुरुवात झाली. पुढे एक चार चाकी वाहन, त्यामागे भगवे झेंड लावलेल्या युवती व महिलांच्या दुचाकी, त्यानंतर युवक या क्रमाने रॅली जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे अंबड चौफुलीवर पोहोचली. रॅलीची शिस्त मोडणार नाही, याची प्रत्येकजण काळजी घेताना दिसून आला. सतकर कॉम्प्लेक्स, उड्डाणपूल, शनीमंदिर, गांधीचमन लक्कड कोट, बसस्थानक मार्गे रॅली मामा चौकात पोहोचली. तेथून फुल बाजार, कपडा बाजार, बडी सडक मार्गे मोटार सायकल रॅली दुपारी ४ वाजता शिवाजी पुतळा चौकात पोहोचली. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोटारसायकल रॅली पुढे मार्गस्थ झाली.कादराबाद, मस्तगड, रेल्वेस्टेशन मार्गे गेलेल्या रॅलीचा भाग्यनगरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात समारोप करण्यात आला. रॅलीची शिस्त मोडून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, रस्त्यावर अस्वच्छता होणार नाही याची काळजी रॅलीत सहभागी प्रत्येकजण घेताना दिसला. त्यामुळे रॅलीमार्गावर बंदोबस्तास असणाºया पोलिसांवर फारसा ताण पडला नाही. जालना शहरासह गाव व तालुका पातळवरील युवकांनी रॅलीत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.
मराठा क्रांती मोर्चा, मुंबईला यावंच लागतंय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:49 AM