औरंगाबाद: वर्षभर विविध मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या आजही जैसे थे असल्याने समाजात राज्य शासनाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा महासभेचे आयोजन करून यापुढील मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्णय २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेतील गारखेडा परिसरातील एका मंगलकार्यालयात पार पडलेल्या राज्यस्तरीय महासभेत घेण्यात आला.
कोपर्डीत घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर ९आॅगस्ट २०१६ पासून राज्यभर मराठा क्र ांती मोर्चे काढण्यात आले. शेवटचा मोर्चा ९ आॅगस्ट रोजी मुंबईत पार पडला. या मोर्चानंतरही राज्यशासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे सोडविण्यात आल्या नाही. यापार्श्वभूमीवर रविवारी शहरात राज्यस्तरीय मराठा महासभेचे आयोजन करण्यात आले.या सभेला राज्यभरातून आलेल्या मराठा समाजातील पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यशासनाकडून निर्णयास होत असलेल्या विलंबातून शासन आपला सयंम पहात असल्याचे नमूद करण्यात आले. राज्यशासनाला मराठा समाजाशी काहीही देणे-घेणे नाही,असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन आहे. कोपर्डीतील पीडितेला अद्याप न्याय नाही, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीलाही बगल देण्यात आली, स्वामीनाथन आयोग लागू करण्याबाबत शासनाची उदासिनता आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाच्या प्रमुख मागणीकडेही शासनाने दुर्लक्ष केले. या सर्व मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आता सरकारविरोधी वातावरण तयार करणे हा ऐकमेव पर्याय असल्याचे यावेळी सर्वानी नमूद केले.
यापुढील मुख्यमंत्र्यांचे कार्यक्र म मराठा महासभा उधळून लावावा, राज्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या दारासमोर जाऊन बसावे आणि मराठा समाजाच्या मागण्यांचे काय झाले याबाबत त्यांना जाब विचारावा. पुढील दोन वर्षात निर्णय न झाल्यास आगामी निवडणूकांमध्ये विद्यमान, आमदार,खासदार यांना मतदान करू नये, असे आवाहन मराठा समाजाला करावे,त्यासाठी राज्यभर मराठा महासभेचे आयोजनन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आजच्या महासभेसाठी तरुण, तरुणींची संख्या अधिक होती.
मराठा क्र ांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी आजच्या महासभेकडे पाठ फिरविली होती. संयोजकांनी महासभेचे आयोजन करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. आजच्या सभेला उपस्थित नसलेल्या आणि मराठा समाजासाठी तन-मन धनाने काम करणा-या प्रत्येकाला सोबत घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.