औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी हिंसक जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावेळी उडालेल्या धावपळीत कर्तव्यावर असलेले हेडकॉन्स्टेबल शाम लखन काडगावकर (४७) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास कायगाव टोका येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी हिंसक जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावेळी उस्मानाबाद येथून आलेल्या कुमकमधील हेडकॉन्स्टेबल शाम लखन काडगावकर (४७) यांना अचानक त्रास होऊ लागला. यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना अधिक उपचारार्थ त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
काडगावकर हे मुळचे उस्मानाबाद येथील रहिवासी असून, त्यांचे नातेवाईक आल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाईल, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी दिली. तत्पूर्वी काडगावकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्युचे नेमके कारण समजू शकेल, असेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.