औरंबागाद - मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांस सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच काकासाहेब यांच्या भावाला शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी देण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे. मराठा आंदोलकांनी काकासाहेब यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारने ही घोषणा केली.
मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर, राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे-औरंगाबाद महामार्गावर कुठल्याही बसेस सुरु न ठेवण्याचा निर्णय आगाराकडून घेण्यात आला आहे. तसेच काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसिलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस नीरीक्षक सुनिल बिर्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
आजच अंत्यसंस्कार -
काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येनंतर मराठा समाज आणि आंदोलक तीव्र झाले होते. त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्री राजीनामा देत नाहीत किंवा आरक्षण देत नाहीत, तोपर्यंत काकासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता. मात्र, सरकारने काकासाहेब यांच्या कुटुबीयांना मदत जाहीर केल्यानंतर आंदोलकांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यामुळे काकासाहेब यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी अनेक मराठा आंदोलक काकासाहेब यांच्या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी गर्दी करत आहेत.
तरुणाने घेतली जलसमाधी
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात तरुणानं गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्यानंतर सकल मराठा समाजाचे आंदोलन चिघळले आहे. गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीत सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. सोमवारी (23 जुलै)सकाळी 10 वाजता ठिय्या आंदोलन सुरू झाले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी गोदावरी नदीवरील पुलाच्या मध्यभागी धाव घेतली. तेथे पोलीस व आंदोलकांमध्ये वाद झाला. गोंधळातच काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 26 वर्ष) यानं दुपारी आरक्षणासाठी घोषणाबाजी करत पाण्यात उडी घेतली.