औरंगाबाद - औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांना आज मराठा आंदोलकांनी अक्षरशः पिटाळून लावलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीपात्रात उडी मारून जीवन संपवणारा तरुण कार्यकर्ता काकासाहेब शिंदे याच्या अंत्यसंस्कारासाठी ते कायगावला पोहोचले होते. परंतु, मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. त्यांचा हा रोष पाहून खैरेंनी तिथून काढता पायच घेतला.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन कालपासून चिघळलं आहे. गंगापूर तालुक्यातील कायगावमध्ये काकासाहेब दत्तात्रय शिंदे या २६ वर्षीय तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलक आक्रमक झालेत. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आज संप पुकारण्यात आला असून ठिकठिकाणी हिंसक आंदोलनही सुरू आहे. रास्ता रोको, गाड्यांची तोडफोड करून, टायर जाळून आंदोलक आपला संताप व्यक्त करताहेत. काहींनी तर आत्महत्येचा प्रयत्नही केलाय.
मराठा आंदोलकांच्या या रागाचा फटका चंद्रकांत खैरे यांना बसला. काकासाहेब शिंदे याच्या पार्थिवावर कायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येनं मराठा कार्यकर्ते उपस्थित होते. काकासाहेब याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी खासदार खैरेही तिथे पोहोचले. ते आल्याचं कळताच, कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आणि पुढे यायला विरोध केला. त्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहून खैरेंनीही तिथून निघून जाणंच पसंत केलं.
(Maratha Kranti Morcha : मराठा समाजाचे आंदोलन चिघळलं, तीन आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न)