औरंगाबाद : मराठवाड्यातील केवळ मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. ५८ मोर्चे काढून आम्हाला अर्धवट न्याय मिळाला. कोपर्डीच्या निर्भया मारेकऱ्यांना झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी नाही आणि मिळालेले आरक्षणही स्थगित झाले. या पार्श्वभूमीवर दि. ८ ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा महाऐक्य परषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा. चंद्रकांत भराट, डॉ. शिवानंद भानुसे यांनी याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, विदर्भ, खानदेश, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. हैद्राबाद स्टेट राजवटीत ओबीसी असलेल्या मराठा समाजाला विलीनीकरणानंतर आरक्षण नाकारण्यात आले. आता समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची झाल्याने २५ ते ३० वर्षांपासून आम्ही आरक्षणाची मागणी करीत आहोत. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी समाजाने ५८ मुक मोर्चे काढले. मात्र आम्हाला अर्धवटच न्याय मिळाला.
मराठा समाजाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी विविध राजकीय पक्षांत काम करणाऱ्या नेत्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून ८ ऑक्टोबरच्या महाएैक्य परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.