औरंगाबाद : आषाढी एकादशीला पंढरपूर येथे गेलेल्या वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासात अडचणी निर्माण होत असल्याने मराठा क्रांती मोर्चाने कायगाव टोका येथील आंदोलनास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे काल दुपारपासून बंद असलेला औरंगाबाद - नगर हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाला आहे.
सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनात औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका येथील गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर, राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होत कायगाव टोका येथे रास्तारोको करत ठिय्या आंदोलन सुरु केले. तसेच आज मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक आली. यामुळे नगर रोडवरील वाहतूक काल दुपारपासूनच ठप्प होती.
यातच काल आषाढी एकादशीनिम्मित्त पंढरपूर येथे गलेले वारकरी परतीच्या प्रवासास निघाले. मात्र, नगर रोडवरील वाहतूक ठप्प असल्याने त्यांना परतीच्या प्रवासात अडचणी आल्या. ही अडचण लक्षात घेऊन मराठा क्रांती मोर्चाने या मार्गावरील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. यामुळे काल दुपारपासून बंद असलेली नगर रोडवरील वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.