औरंगाबाद -मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे. सोमवारी (23 जुलै) आंदोलनादरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे (26 वर्ष) या तरुणानं नदीत जलसमाधी घेतल्यानं मराठा समाजाचे आंदोलन चिघळले आहे. दरम्यान, आज या आंदोलनादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या आणखी तीन कार्यकर्त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड तालुक्यात गुड्डू सोनावणे (33 वर्ष) या आंदोलकानं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गुड्डू गंभीर जखमी झाले आहेत. देवगांव रंगारी येथील ही घटना आहे. गु़ड्डू सोनावणे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जगन्नाथ सोनावणे (वय 55 वर्ष) नावाच्या आंदोलकानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
लातूरमध्ये आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्नमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान मंगळवारी (24 जुलै) सकाळी शिवाजी चौक येथे एका आंदोलकानं अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. दरम्यान, शहर व जिल्ह्यात सर्वत्र बंद आंदोलन शांततेत सुरू असताना शिवाजी चौकात घडलेल्या घटनेमुळे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या आंदोलकाला ताब्यात घेतल्यानंतर मराठा समाजाच्या अन्य कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला.
तरुणाने घेतली जलसमाधी
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीत सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. सोमवारी (23 जुलै)सकाळी 10 वाजता ठिय्या आंदोलन सुरू झाले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी गोदावरी नदीवरील पुलाच्या मध्यभागी धाव घेतली. तेथे पोलीस व आंदोलकांमध्ये वाद झाला. गोंधळातच काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 26 वर्ष) यानं दुपारी आरक्षणासाठी घोषणाबाजी करत पाण्यात उडी घेतली. पोहता न आल्यामुळे तो 200 मीटर वाहून गेला. स्थानिक मच्छिमारांनी त्याला बाहेर काढले. तातडीनं रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चानंमहाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परतत असल्यानं त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर बुधवारी (25 जुलै) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गेलेल्या वारकऱ्यांना घरी परतण्यास अडथळा ठरू नये, म्हणून सातारा, पंढरपूर, पुणे आणि मुंबईला महाराष्ट्र बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती मराठा मूक मोर्चा समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिली आहे.