औरंगाबाद : मराठा आरक्षणला विरोध करणारी याचिका दाखल करणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीला फंडिंग केल्याचा आरोप करीत डॉ. प्रवीण काबरा यांना काळे फासण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ९ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. काबरा हॉस्पिटल येथे हे आंदोलन झाले.
सुनील कोटकर , रवी कळे, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय सावंत, भरत कदम , संतोष गायकवाड, गणेश उगले पाटील , निलेश ढवळे , पंढरीनाथ गोडसे , दत्तात्रेय घारे अशी आंदोलकांची नावे आहेत. याविषयी सुनील कोटकर आणि रवींद्र काळे यांनी सांगितले की, मराठा समाज सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा शांतताप्रिय समाज आहे. असे असताना मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत आरक्षण मिळाल्यावर सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही चळवळ उभी राहिली. या चळवळीतर्फे नागपूर खंडपीठ येथे मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल केली. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरण सुनावणीला होते. तेव्हा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांमध्ये सेव्ह मेरिट सेव्ह नेशनची एक याचिका होती. त्यांनी लाखो रुपये खर्चून मराठा आरक्षणाला विरोध केला. यामुळे आरक्षणाचा कायदा रद्द झाला. सेव्ह मेरिट सेव्ह नेशनला आर्थिक रसद पुरविणाऱ्या लोकांची यादी आमच्या हाती लागली. औरंगाबाद शहरातील काबरा हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण काबरा यांचा यात समावेश आहे. यामुळे शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे त्यांना जाब विचारुन काळे फासणार होतो. त्यांच्या हॉस्पिटलजवळ जाताच पोलिसांनी आम्हाला पकडले, असे त्यांनी सांगितले.
=====
पोलिसांनी गुन्हा नोंदविला
महेशनगर येथील डॉ. काबरा यांच्या रुग्णालयात मराठा क्रांती मोर्चाचे लोक जाणार असल्याचे कळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, फौजदार हारुण शेख, हवालदार सानप, राठोड आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनापूर्वीच बंदोबस्त लावला. कार्यकर्ते येताच पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी एक मराठा, लाख मराठा!, डॉक्टर काबरांविरोधात घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलकांवर जमावबंदीसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंदविला.