औरंगाबाद: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज हवालदिल झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा सोमवारपासून राज्य सरकार आणि सर्वपक्षिय आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करणार आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक आज औरंगाबादेत पार पडली.
या बैठकीला विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चिकित्सा करण्यात आली. यानंतर पुढील कायदेशीर मार्ग आणि आंदोलन याविषयी निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील म्हणाले की, राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागे उभे राहावे . शासनाची भूमिका समजू द्या तोपर्यंत समाजबांधवांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये . आरक्षणाला स्थगिती मिळाली म्हणजे सर्व संपले असे गृहित धरू नये. संयम सोडुन कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले.
किशोर चव्हाण म्हणाले ,पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत यावर चर्चा होणे अपेक्षीत. मराठा समाजाच्या मुलानी आत्महत्या करायची नाही. ऱाज्य , केंद्र आणि न्यायालय असे तीन पर्यायी मार्ग क्रांतीमोर्चासमोर आहे . आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाली म्हणजे सर्व मार्ग बंद झाले असा त्याचा अर्थ होत नाही . प्रकरण पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठांकडे वर्ग करतांना केवळ मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा झटपट निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारच्या आरक्षणाच्या याचिका घटनापीठाकडे वर्ग करतांना आरक्षणाला स्थगिती दिली नव्हती.
या निकालाने मराठा समाजावर अन्याय झाल्याचे राजेंद्र दाते यांनी स्पष्ट केले. पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत यावर अपेक्षीत. मराठा आरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागेल. आरक्षणाला स्थगिती मिळाली म्हणून मराठा समाजाच्या मुलांनी आत्महत्या करायची नाही. ऱाज्य , केंद्र आणि न्यायालय तीन मार्ग समाजासमोर आहे. या तिन्ही ठिकाणी लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे याकरिता केंद्र सरकारने वकील नियुक्त करणे आवश्यक होते. यामुळे केंद्र सरकारची भूमिकाही महत्वाची आहे.
यावेळी पूजा मोरे, डॉ. शिवानंद भानुसे ,आप्पासाहेब कुढेकर , रवी काळे आदीनी मनोगत व्यक्त केले. मराठा समाज सोमवारपासून आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करणार असल्याचे यावेळी प्रसारमाध्यमाना सांगण्यात आले. पोलीस बंदोबस्त मराठा क्रांती मोर्चाची बैठक होणार असल्याचे कळताच पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, पो नि. संतोष पाटील , विशेष शाखेचे कंटाळे आदीसह अन्य अधिकारी उपस्थित होते.