लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रविवारी (दि.२९) क्रांतीचौकात कार्यकर्त्यांनी स्वत:लाच आसूडाने फटके मारून घेत आत्मक्लेश केला. या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांनी पोतराजांचा पारंपरिक पेहराव परिधान केला होता.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १९ जुलैपासून मराठा क्रांती मोर्चाने क्रांतीचौकात ठिय्या देत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक रोज वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत. चार दिवसांपूर्वी मुंडन आंदोलन झाले. त्यानंतर शिवचरित्र वाचन तर शनिवारी आंदोलकांनी दिवसभर मराठा आरक्षण आणि समाज याबाबत तरुणांसोबत चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी राजपूत समाजाने तर शनिवारी मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला. कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे, या मागणीसाठी आठ कार्यकर्त्यांनी पुंडलिकनगर येथील जलकुंभावर चढून शासनाचे लक्ष वेधले. गुन्हे परत घेण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रविवारी पदाधिका-यांनी स्वत:वर आसूड ओढून घेतले. एवढ्या दिवसांपासून आंदोलन करूनही सरकार मागण्या मान्य करीत नसल्याने कार्यकर्त्यांनी स्वत:ला चाबकाचे फटके मारून घेतले. हे कार्यकर्ते पोतराजाच्या वेशात होते. या आंदोलनात मनोज गायके, साईनाथ वेताळ, रवींद्र काळे, संतोष काळे पाटील, अंकत चव्हाण, सुनील कोटकर, सुकन्या भोसले, अॅड. सुवर्णा मोहिते यांच्यासह महिला, तरुणी आणि शेकडो तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मराठा क्रांती मोर्चाचे आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:18 AM