छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आठव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील मुकुंदवाडी चौकात गुरुवारी सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत रस्त्यावर टायर जाळून शासनाचा निषेध केला.
एक मराठा ,लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहत नाही ,राज्य सरकारच करायचं काय ?खाली मुंडकं वर पाय! अशा घोषणा देत गुरुवारी सकाळी मराठा आंदोलक जालना रोडवर चक्काजाम सुरू केले. यावेळी आंदोलकांनी हातात मराठा आरक्षणाची मागणी करणारे आणि मनोज जरांगे पाटील यांचे छायाचित्र असलेले बॅनर घेऊन रस्त्यावर ठिया दिला.यावेळी आंदोलकांनी तीन गाढव आणले होते. या गाढवांच्या गळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र लटकविण्यात आले होते. तर काळा शर्ट घालून बाबासाहेब डांगे हे उंटावर बसून शासनाचा निषेध करीत होते.
टायर जाळून केला सरकारचा निषेधयावेळी आंदोलकांनी मुकुंदवाडी एसटी वर्कशॉपच्या भिंती लगत जालना रोडवर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध केला .टायर झाल्यामुळे धुराचे लोट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हे पाहून तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी धाव घेतली. फायर ब्रिगेडला बोलावून पेटलेले टायर विझवून टाकले.
पोलिसांचा बंदोबस्तआंदोलकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून टाकला. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मुकुंदवाडी चौकापासून काही अंतरावर असलेल्या धूत हॉस्पिटल पासून आणि एपीआय कॉर्नर कडून वाहतूक वळवली होती. मात्र काही वेळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.