औरंगाबाद- राज्यभरात मराठा आंदोलन पेटलं आहे. परंतु ते हिंसक होऊ देऊ नका. तसेच आंदोलनासाठी कोणीही आत्महत्या करू नका, तुमचं भविष्य सुरक्षित होण्यासाठीच आरक्षणाची मागणी केली जातेय. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नका, असं आवाहन मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन केलं आहे. तसेच सरकारनं विशेष अधिवेशन कधी घेणार याची तारीख जाहीर करावी आणि मराठ्यांना आरक्षण कसं देणार, काय निकष लावणार यांचीही माहिती उघड करावी, असंही समन्वयकांनी सरकारला सांगितलं आहे. मराठा तरुणांना वाटते की, सरकार आपल्याला फसवत आहे. आंदोलनात आतापर्यंत चार बळी गेले आहेत. यामुळे अशा घटना पुढे घडू नये यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी २४ तासांत कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या औरंगाबाद येथील समन्वयकांची आज सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यात समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलक आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी तरुण आत्महत्या करत आहेत. आज औरंगाबाद येथे प्रमोद होरे पाटील या तरुणाने रेल्वे खली उडी घेऊन आत्महत्या केली. यानंतर आंदोलकांनी मुकुंदवाडी परिसर बंद केला. तसेच जालना रोडवर रस्तारोको केले. यासोबतच शहरात हर्सूल सावंगी आणि क्रांती चौक येथेही आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यात मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील, रवी काळे, राजेंद्र जंजाळ, अभिजीत देशमुख, बाळासाहेब थोरात, आप्पासाहेब कुढेकर, सुरेश वाकडे, रमेश केरे, चंद्रकांत भराड, मनोज गायके यांची उपस्थिती होती. यावेळी समन्वयक विनोद पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, सद्य स्थितीत मराठा समाजाच्या तरुणांना असे वाटते की सरकार त्यांना फसवत आहे. आंदोलनात आतापर्यंत चार बळी गेले असून आणखी अशा घटना घडू नये यासाठी सरकारने गांभीर्याने निर्णय घ्यावा. सरकारने चर्चा न करता आता कृती करावी. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी २४ तासात कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याची मागणीही यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली.
Maratha Reservation: 24 तासांत मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 5:43 PM