औरंगाबाद : योगीराज भाऊराव नाटकर याने आज सकाळी 'राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चाल ढकल करत आहे याला कंटाळून मी आज आत्मदहन करणार आहे' या आशयाची फेसबुक पोस्ट टाकली. ही व्हायरल पोस्ट औरंगाबाद पोलिसांच्या नजरेत आली. यानंतर पोलिसांनी युवकाचे नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने समुपदेशन केले व त्यास आत्मदहनाच्या विचारापासून परावृत्त केले.
मराठा आरक्षणासाठी राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलने सुरु आहेत. मात्र, राज्य सरकार आरक्षण देण्यास चालढकल करत आहे असा आंदोलकांचा समज झाल्याने ते आक्रमक झाले आहेत. आज सकाळी सातारा परिसर येथील योगीराज नाटकर (३८) याने फेसबुकवर, 'राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चाल ढकल करत आहे याला कंटाळून मी आज आत्मदहन करणार आहे' अशा आशयाची पोस्ट शेअर केली. काही वेळातच व्हायरल झालेली ही पोस्ट पोलीस हेडकॉन्स्टेबल कारभारी नलावडे यांच्या नजरेस पडली. त्यांनी याची माहिती तत्काळ सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांना दिली.
यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रमोरे हे विशेष शाखेचे पोलीस कारभारी नलावडे, पोलीस शिपाई गोपाल देठे व कपिल खिल्लारे व नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्यासह योगीराज राहत असलेल्या सातारा परिसरातील गुरुदत्तनगर येथे गेले. यानंतर योगीराज याचे आई-वडील व मित्र यांच्या मदतीने पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. यामुळे योगीराज याचे मत परिवर्तन व्होऊन त्याने आत्मदहनाचा विचार मनातून काढून टाकला.
पोलिसांनी नौकरीसाठी घेतला पुढाकार पोलिसांना उद्योजक सचिन मुळे यांना योगीराज याच्याबद्दल माहिती देऊन तो बेरोजगार असल्याचे सांगितले. यावर मुळे यांनी त्याला इलेक्ट्रिशियन म्हणून त्यांच्या मालकीच्या शोरूममध्ये लागलीच नौकरी दिली.