औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्याआंदोलनावेळी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारने नोकरी दिली. मात्र, तरीही अविनाश शिंदे यांची घोर निराशा झाली आहे. कारण, काकासाहेब यांचे भाऊ अविनाश यांना शिक्षकेत्तर पदावर लिपिक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, त्यांना दरमहा 2 हजार रुपयांचे मानधन देण्याचं या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे पुढील 3 वर्षांसाठी हे मानधन देण्यात येणार असून त्यानंतर 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येईल.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथे झालेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने नदी उडी घेऊन आपला जीव दिला होता. त्यानंतर, मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिकच तीव्र बनले होते. त्यानंतर, सरकारने काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत जाहीर करुन कुटुंबीयातील एका सदस्यास नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आमदार सतीश चव्हाण यांनी अविनाश यांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या रघुनाथनगर (ता. गंगापूर) येथील न्यू हायस्कूलमध्ये सात ऑगस्ट 2018 ला कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी दिली. मात्र, अविनाश यांना केवळ प्रति महिना 2 हजार रुपयांचेच मानधन मिळत असल्याची बाब समोर आली आहे. अविनाश यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात तसा उल्लेखच करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 3 वर्षांसाठी काकासाहेब शिंदे यांच्या भावाला 2 हजार रुपये मानधनावर काम करावे लागणार आहे.
शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेवर निर्बंध असल्याने आमदार चव्हाण यांनी पाठपुरावा करून 'खास बाब' म्हणून अविनाश यांच्या नोकरीसाठी पदमान्यता मिळवली. सहाव्या वेतन आयोगानुसार, कनिष्ठ लिपिक पदासाठी अनुज्ञेय वेतनश्रेणीमध्ये नियुक्तीची मागणी शाळेने शासनाकडे केली होती. मात्र, 21 फेब्रुवारी 2019 ला मिळालेल्या नियुक्तिपत्रानुसार, अविनाशला तीन वर्षांकरिता महिना दोन हजार रुपये मानधन द्यावे, असे सांगण्यात आले आहे.
याबाबत बोलताना आमदार सतीश चव्हाण यांनी अविनाशला शाळेकडून दरमहा 10 हजार रुपये मानधन दिले जाईल, असे सांगितले. अविनाशच्या वेतनश्रेणीबाबतही सरकारने 'खास बाब' म्हणून निर्णय घ्यावा. यासाठी नियुक्तिपत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फॅक्स करत वेतनश्रेणी नियमित करण्याची विनंती केली आहे. मात्र, सरकारचा निर्णय येईपर्यंत शाळेतर्फे अविनाशला दरमहा 10 हजार रुपये देण्यात येतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अविनाश हे गेल्या 7 महिन्यांपासून शाळेत लिपिक म्हणून नोकरीवर रुजू आहेत. पण, शाळेकडून त्यांना अॅडव्हान्स म्हणून केवळ 20 हजार रुपयेच देण्यात आले आहेत.