छत्रपती संभाजीनगर: मी जातीवादी माणूस नाही, एका भाषणादरम्यान मी 'लायकी' नसलेल्या लोकांच्या हाताखाली मराठ्यांना काम करावे लागत आहे, असे विधान केले होते. या विधानाचा राजकारण्यांनी विपर्यास करीत गैरसमज पसरविण्याचे काम सुरू केले आहे, यामुळे आज मी 'लायकी' शब्द मागे घेत असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहिर केले.
शारीरिक ग्लानी आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन दिवसांपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जरांगे पाटील यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजातील उच्च शिक्षित तरूण आज त्यांना नोकरी मिळत नसल्याने राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण्यांच्या हाताखाली काम करताना दिसतात.
संबंधित बातमी- 'मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप
याचा संदर्भ देत मी लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली मराठ्यांना काम करावे लागत असल्याचे बोललो होतो,मात्र माझ्या विधानाचा विपर्यास करीत जुनाट नेत्यांनी (मंत्री छगन भूजबळ)यांनी सुरू केला. मी कधीच जातीवाद केला नाही. मी जेथे राहतो, त्या गोदा पट्ट्याती सर्व जाती, धर्माचे लोक माझ्या जवळचे आहेत, त्यांना विचारा मी जातीवादी माणूस आहे का, असेही ते म्हणाले. माझ्या विधानाबद्दल गैरसमज पसरविल्या जात असल्याने आज'लायकी' शब्द मागे घेत असल्याचे ते म्हणाले.