वैजापुर (औरंगाबाद ) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पारळा येथील मन्याड प्रकल्पावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी आल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, दुपारी चार वाजेपर्यंत वाट पाहू नसता जे घडेल त्याला प्रशासन जबाबदार राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
कायगाव टोका येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त मन्याड प्रकल्पावर तैनात केला आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.संदिपान सानप,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, तहसीलदार सुमन मोरे,वैजापुरचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी,विरगावचे पि.आय अतुल येरमे,शिऊरचे पि.आय तांदळे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, अग्निशमन विभागाचे जवान, तटरक्षक जवान, बोट, रूग्णवाहिका आदी यंत्रणा मन्याड प्रकल्पावर सज्ज ठेवण्यात आले आहे.
यावेळी आंदोलकानी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी चिकटगाव येथील देविदास निकम यांच्यासह तिन तरुणाने प्रकल्पात उडी मारली होती त्याला सुरक्षारक्षकांनी सुरक्षित बाहेर काढले. दुपारी चार वाजेपर्यन्त जिल्हाधिकारी उदय चौधरी येथे येवून निवेदन स्वीकारले नाही तर जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अजय साळुंके, चंद्रशेखर साळुंके, संतोष निकम यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे अभय पाटील चिकटगावकर,भागिनाथ मगर,राजेंद्र मगर,संतोष सूर्यवंशी पोहचले असून त्यांनी आंदोलकांशी चर्चा सुरु केली आहे. आंदोलनस्थळी ६ ते ७ हजार नागरिकांची उपस्थिती आहे.