औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. उलट परस्परांवर आरोप करण्यात व्यग्र असलेल्या राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने आजपासून स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली.
५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणारा निर्णय दिला. तेव्हापासून मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे नेते परस्परांवर आरोप करीत आहेत. आरक्षणाचा कायदा मजबूत नव्हता यामुळे तो टिकला नाही असे राज्यसरकार म्हणत आहेत. तर कायद्याची बाजू मांडण्यात राज्यसरकार कमी पडल्यामुळे आरक्षण रद्द झाले असे भाजपचे नेते म्हणत आहेत. एकमेकांवरील कुरघोडीच्या राजकारणासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षानी मराठा आरक्षणाचा बळी घेतल्याची चर्चा सध्या मराठा समाज करीत आहेत.
यामुळे मराठा समाजात त्यांच्याविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कोविड संसर्गामुळे रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे सध्या शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या उपस्थितीत आज राजकारण्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आजपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली. काळे कपडे घालून स्वतः च्या घरावर पाटील यांनी काळा झेंडा लावला. यासोबत त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत समाजानेही स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अभिजीत देशमुख, मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक आप्पासाहेब कुढेकर, ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांची उपस्थिती होती.
घरावर काळा झेंडा लावून निषेध घरावर काळे झेंडे लावून करत असलेला हा निषेध न्यायालयाविरोधात नाही. मराठा आरक्षणासाठी सरकारने अजूनही काही पर्यायी व्यवस्था केली नाही. शिवाय त्यांच्या हालचालीही दिसत नसल्याने आम्हाला नाईलाजाने निषेध व्यक्त करावा लागत आहे. कोरोनाच्या या महामारीमुळे आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. एक- एक प्राण सर्वांसाठी महत्वाचा आहे. मराठा समाजाने स्वतःच्या घरावर काळा झेंडा लावून निषेध व्यक्त करावा.- विनोद पाटिल, याचिकाकर्ता.