खुलताबाद: आरक्षणाच्या मागणासाठी मराठा समाजाच्या आंदोलकांनी आज गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान खुलताबाद तहसील,पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयास कुलूप ठोकले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
खुलताबाद तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काटशिवरीफाटा, खुलताबाद येथे गेल्या दहा दिवसापासून साखळी, त्यानंतर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. अनेक आंदोलनकर्त्यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरक्षण मिळत नसल्याने आंदोलकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आज दुपारी आंदोलकांनी खुलताबाद तहसील कार्यालय परिसरात येवून आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.तसेच कर्मचाऱ्यांना बाहेरकाढून कार्यालयाच्या मुख्यदरवाजास टाळे ठोकत शासनाच्या वेळकाढूपणा धोरणाचा निषेध केला.
त्यानंतर खुलताबाद पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालयात जात आंदोलकांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढत प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, सपोनि अमोल ढाकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.