मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले. आंदोलन करणाऱ्यांवर सुमारे १३ हजार ५०० गुन्हे दाखल झाले. ५३ तरुणांनी आत्मबलिदान दिले तेव्हा आरक्षण मिळाले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे समाजासाठी काळा दिवस ठरला आहे. तरुणांनी संयम सोडू नये. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने मराठा समाजासाठी निर्णय घ्यावा.
अभिजीत देशमुख, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक
राजकारण्यांनी मराठा समाजाचे नुकसान केले
सत्ताधारी आणि विरोधात बसलेल्या राजकारण्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आरक्षणाबाबत गंभीर नव्हते. त्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे आजचा निकाल आला. मराठा समाज राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देइल.
आप्पासाहेब कुढेकर , समन्वयक क्रांती मोर्चा.
=============
आता पुन्हा रस्त्यावर उतरणे हाच पर्याय
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने धक्का बसला. आरक्षणाबाबत तामिळनाडूतील आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका घेणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजावर अन्याय केला. सर्वच राजकीय पक्षाची मानसिकता मराठा समाजाला न्याय देण्याची नाही. यामुळे त्यांचा निषेध. रस्त्यावरील आमचा लढा सुरु राहील.
- मनोज गायके, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा .