औरंगाबाद : राज्यकर्त्यांना मूक भाषा समजत नसेल तर अखिल भारतीय छावा संघटना मराठा आरक्षणासाठी ठोक मोर्चा काढून रस्त्यावर आंदोलन करेल, असा सज्जड इशारा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी गुरुवारी येथे दिला.
मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सिंचन भवन येथे छावा संघटनेची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जावळे म्हणाले की, मराठा आरक्षणाकडे राज्य आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. राज्यात मराठा युवक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत सुरू असलेले राजकारण लज्जास्पद आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जप्रकरणासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करून या मंडळाला शासनाने १ हजार कोटी रुपये निधी द्यावा, कोपर्डीच्या नराधमांना तातडीने फासावर लटकवा, २०१९ आणि २०२० साली एसईबीसीमधून निवड झालेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून तातडीने सेवेत सामावून घेण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृह सुरू करावे, यासह अन्य मागण्यांसाठी छावा युवा संघटना यापुढे मूक नव्हे तर ठोक आंदोलनाची भूमिका घेईल, असे जावळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला संघटनेचे भीमराव मराठे, विजयकुमार घाडगे, पंजाबराव काळे, आप्पासाहेब कुढेकर, बालाजी सूर्यवंशी, अशोक मोरे, शिवाजी मार्कंडे आदी उपस्थित होते.