औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहरातील चिखलठाणा भागातील चौधरी कॉलनी येथील उमेश एंडाईत या युवकाने आज आत्महत्या केली. यानंतर चिखलठाणा परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमले असून त्यांनी जालना रोडवरील वाहतूक बंद केली आहे.
उमेश एंडाईत (२२ वर्ष) या युवकाचे शिक्षण बी.एस्सी पर्यत झाले होते. यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. बुधवारी तो एका ठिकाणी नोकरीच्या शोधात गेला होता. मात्र त्यास नोकरी मिळाली नाही. यामुळे तो निराश झाला होता. यानंतर आज त्याने आत्महत्या केली. यावेळी त्याने लिहलेली चिट्ठी सापडली असून त्यात, ''मी माझ्या मम्मी- पप्पांची क्षमा मागतो, मला त्यांनी शिकवले, पण मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, माझं शिक्षण अपूर्णच राहिले, बी. एस्सी. होऊनही नोकरी मिळत नाही, मी मराठा आहे म्हणून कि काय ?' असा मजकूर आहे. त्यास एक भाऊ, एक बहिण आहेत. उमेशचे वडील खाजगी कंपनीत काम करतात तर आई मजुरी करते.