उस्मानाबाद : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी उस्मानाबादेत मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़ मागील पंधरा दिवसांपासून याची मोर्चेबांधणी सुरू होती़ त्यातच फक्त मराठा समाज बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले जात असल्याने एक प्रकारे मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रदर्शन यानिमित्ताने घडणार आहे़ सुमारे दोन लाखावर समाजबांधव या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज संयोजकानी वर्तविला आहे़अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी यासह इतर विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील जिजाऊ चौकातून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे़ या मोर्चाची गावा-गावात बैठका घेवून तयारी करण्यात आली आहे़ त्यानिमित्ताने मोर्चाला मोठा प्रतिसाद लाभणार असल्याचे गृहित धरून शहराच्या चारही दिशेला वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे़ याबरोबरच मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. यासोबतच स्वच्छता व इतर सहकार्यासाठी सुमारे २ हजारावर स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत़ या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे़ सदरील बदलाची नोंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
‘मराठा एकजूट’ आज दाखविणार ताकद
By admin | Published: August 26, 2016 12:31 AM