औरंगाबाद :मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही. उलट आजची सुनावणी दोन आठवडे वाढविण्यात आल्याचे समजल्यामुळे नैराश्येतून एका तरुणाने थेट क्रांतिचौकात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती कळताच क्रांतिचौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.दत्ता कचरू भोकरे (२८, रा. शिवाजीनगर), असे या तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, दत्ता भोकरे हा तरुण मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आतापर्यंत सातत्याने सहभागी राहिलेला आहे. तो नोकरीच्या प्रतीक्षेतही होता. मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठल्यास नोकरी मिळेल या आशेवर तो होता. मराठा आरक्षणासंदर्भातील स्थगिती बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून उठविली जाईल अशी त्याला अपेक्षा होती. बुधवारी सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आणि स्थगिती उठविण्यात आली नसल्याचे त्याला समजल्याने तो अस्वस्थ झाला आणि त्यातूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कुणीतरी मराठा आरक्षणावरील याचिकाकर्ते विनोद पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांना कळविली. त्यांनी तातडीने क्रांतिचौक पोलिसांना फोन करून याविषयी माहिती दिली. पोलीस निरीक्षक दराडे आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ क्रांतिचौकात विष घेतलेल्या तरुणाला पोलिसांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. या घटनेची नोंद क्रांतिचौक ठाण्यात करण्यात आली. मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये -मराठा आरक्षणाची लढाई अद्याप संपली नाही. एवढ्या प्रयत्नाने मिळविलेले आरक्षण स्थगिती मिळाली असली तरी आपल्याला कायदेशीर लढाई लढायची आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये. - विनोद पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते भोकरे याने क्रांतीचौकात आल्यावर फेसबुक लाइव्ह केले. त्यात त्याने नमूद केले की, आज सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी पाहिली. सरकार केवळ राजकारण करीत आहे. मराठा तरुण आणि समाजाशी राजकारण्यांना काहीही देणे-घेणे नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व संयोजकांचे अभिनंदन, असे तो म्हणाला.
मराठा आरक्षण : औरंगाबादेत विष पिऊन मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 5:48 AM