औरंगाबाद : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही. उलट आजची सुनावणी दोन आठवडे वाढविण्यात आल्याचे समजल्यामुळे नैराश्येतून एका तरुणाने थेट क्रांतीचौकात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती कळताच क्रांतीचौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दत्ता कचरू भोकरे (२८, रा. शिवाजीनगर), असे या तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, दत्ता भोकरे हा तरुण मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आतापर्यंत सातत्याने सहभागी राहिलेला आहे. तो नोकरीच्या प्रतीक्षेतही होता. मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठल्यास नोकरी मिळेल या आशेवर तो होता. मराठा आरक्षणासंदर्भातील स्थगिती बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून उठविली जाईल अशी त्याला अपेक्षा होती. बुधवारी सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आणि स्थगिती उठविण्यात आली नसल्याचे त्याला समजल्याने तो अस्वस्थ झाला आणि रात्री साडेसात वाजेच्या सुमारास क्रांतीचौकात आला.
यावेळी दत्ताने अचानक सोबत आणलेली विषाची बाटली तोंडाला लावली. ही बाब कुणीतरी मराठा आरक्षणावरील याचिकाकर्ते विनोद पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांना कळविली. त्यांनी तातडीने क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांना फोन करून याविषयी माहिती दिली. पोलीस निरीक्षक दराडे आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ क्रांतीचौकात विष घेतलेल्या तरुणाला पोलिसांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची नोंद क्रांतीचौक ठाण्यात करण्यात आली.
चौकट...
मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये
याविषयी याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, घाटीत उपचार घेत असलेल्या दत्ता भोकरेची भेट घेतली. तो बोलत आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. मराठा आरक्षणाची लढाई अद्याप संपली नाही. एवढ्या प्रयत्नाने मिळविलेले आरक्षण स्थगिती मिळाली असली तरी आपल्याला कायदेशीर लढाई लढायची आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये.