- बापू सोळुंकेऔरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामात कोलते पिंपळगाववासीयांचे (ता. भोकरदन, जि. जालना) मोठे योगदान आहे. निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी पेटून उठलेल्या गावकरी आणि रजाकार यांच्यात २२ जून १९४८ रोजी सशस्त्र लढाई झाली. गावकऱ्यांनी गनिमी कावा पद्धतीने दारूगोळा आणि छोट्या बंदुकींच्या जोरावर मोठ्या हिमतीने रजाकारांशी दिवसभर चिवट झुंज दिली. या स्वातंत्र्यसमरात पिपंळगातील चार जणांना हौतात्म्य आले. सशस्त्र रजाकारांची संख्या जास्त असल्याने शेवटी त्यांनी गावांवर हल्ला करीत मोठे वाडे, गुरांच्या गोठ्यांना आगी लावल्या आणि ३५ तरुणांना पकडून नेले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही वर्षभर मराठवाड्यावर हैदराबाद संस्थानचा राजा निजामाची सत्ता होती. आपणही स्वतंत्र व्हावे, यासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील तरुण पेटून उठले होते. कोलते पिंपळगाव, कोलते टाकळी, धानोरा, रिधोरा, ही शेजारी शेजारी असलेली गावे. येथील लाला लक्ष्मीनारायण आणि दगडाबाई शेळके यांच्या प्रेरणेने मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात ते उतरले होते. अनेक जण भूमिगत राहून काम करीत. १८ जून १९४८ रोजी रजाकाराचे सैनिक शेतसारा वसुलीसाठी पिंपळगावाजवळील सावखेडा गावात आले आहेत. त्यांनी गावांत दवंडी देऊन कर देण्यासाठी दादागिरी सुरू केली आहे. गावांतील दर्ग्याजवळ बोकूड कापून ते शिजवत असल्याची माहिती एका तरुणाने पिंपळगावात येऊन दिली. यानंतर पिंपळगावातील संपत भिल्ल या बंदूकधारीला सोबत घेऊन १५ ते २५ वयाच्या १५ ते २० जणांनी अचानक सावखेड्यात वसुलीसाठी आलेल्या रजाकारांवर गनिमी काव्याने हल्ला केल्याने त्यांना पळून जावे लागले.
या घटनेचा बदला घेण्यासाठी चार दिवसांनी २२ जून १९४८ राेजी सशस्त्र सैनिकांसह पिंपळगावावर चाल केली. रजाकार येतील, याची शाश्वती गावकऱ्यांना होती. यामुळे गावातील महिला, लहान मुले, मुलींना गावातील एका फकिराच्या वाड्यात लपवून ठेवण्यात आले. धाडसी तरुण दारूगोळ्यासह गढींवर जाऊन बसले होते. रजाकारांनी सिमेवरूनच गढीच्या दिशेने गोळीबार सुरू केला. गढीवरील तरूणांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत धुमश्चक्री झाली. यात दाजीबा काशीबा म्हस्के, केशवरा कोलते, पांडुरंग योगीराज बिनोरकर आणि दगडू वीर गोसावी यांना वीरमरण आले. या वेळी निजामांनी दिगंबरदादा, सर्जेराव अण्णा सोळुंके, दगडू रामराव सोळुंके, हिम्मतराव, परभतराव पाटील यांच्यासह सुमारे ३५ ते ४० जणांनी लाल लक्ष्मीनारायण आणि बाबूराव पाटील सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही लढाई लढली.
निजामाच्या पोलीस ठाण्यावर फडकावला तिरंगा ध्वजनिजामाचे हसनाबाद येथे पोलीस ठाणे होते. पिंपळगावातील काही धाडसी तरुणांनी मे १९४८ मध्ये रात्री हसनाबादला जाऊन त्या पोलीस ठाण्यांवरील निजामाचा झेंडा काढून तेथे तिरंगा ध्वज फडकावला होता. हा ध्वज पिंपळगावाच्या तरुणांनी फडकावल्याचे रजाकारांना समजले. तरुणांना पकडण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला. मात्र यात त्यांना यश आले नव्हते.
३५ तरुणांना पकडून नेले हर्सूल जेलमध्येधुमश्चक्रीनंतर गावात आल्यावर रजाकारांनी शामराव ठमाजी सोळुंके यांच्यासह गावातील तीन वाडे पेटवून दिले. अनेकांच्या गुरांचे गोठे आणि चारा पेटवून नुकसान केले. या वेळी त्यांनी ३५ तरुणांना अटक केली. त्यांना अटक केल्यानंतर पिंपळगाव येथून हर्सूल जेलपर्यंत मारहाण करीत नेण्यात आले. तेथे हे सर्व तरुण मराठवाडा मुक्त होईपर्यंत जेलमध्ये होते.
हुतात्मा स्मारकावर दरवर्षी ध्वजारोहणकोलते पिंपळगावकऱ्यांचे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढाईचे योगदान लक्षात घेऊन १९८२ साली गावात हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. या स्मारकाच्या देखभाल, दुरुस्तीकडे मात्र शासनाचे लक्ष नाही. स्वातंत्र्य दिन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि प्रजासत्ताकदिनी तेथे गावकरी ध्वजारोहण करतात.