- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : इंग्रजाळलेले, हिंदीमिश्रित मराठी आजची पिढी सहज बोलते. बोलताना होणारी हिंदी-इंग्रजीची घुसळण मराठीच्या बोली भाषेतील सौंदर्य बिघडवते. मराठी बोलतानाच ही गत असून काना, उकार, मात्रा, वेलांटी यांची अचूक जागा मात्र मराठी लेखनातून हरवत चालली आहे. म्हणूनच, तर तोडक्या व्याकरणामुळे वैभवशाली मराठीचा पायाच कमकुवत होत असताना ‘चला, अचूक मराठी लिहू या! ’ असे म्हणत प्रा. नागेश अंकुश यांनी आजच्या विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लावण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे कनिष्ठ विभागात मराठी हा विषय शिकविणारे प्रा. नागेश याविषयी सांगताना म्हणाले की, मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय, गृहपाठ तपासताना असे लक्षात यायचे की, मुलांनी लिहिले तर अगदी नीटनेटके आहे; पण या नीटनेटकेपणातही व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत. आपण या चुका करीत आहोत, हे या मुलांच्या गावीही नसते. कारण मुलांना हस्ताक्षर छान काढा, स्वच्छ लिहा असे सांगितले जाते; पण मुले व्याकरणाच्या चुका टाळून अचूक लिहित आहेत की नाही, हे मात्र फार कमी शिक्षक काळजीपूर्वक तपासतात.
शाळेपासूनच मराठीचे व्याकरण दुर्लक्षित राहिल्यामुळे मराठी विषय घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लिखाणातही अनेक चुका आढळून येतात. व्याकरण हे कोणत्याही भाषेचे खरे सौंदर्य असते. गौरवशाली परंपरा असणाऱ्या मराठीचा पायाच आणखी डळमळीत होऊ नये, म्हणून मराठीच्या व्याकरणाविषयी जनजागृती करण्यास आपण सुरुवात केली, असे त्यांनी नमूद केले. याकामी त्यांना भगवंत देशमुख, डॉ. दादा गोरे, डॉ. सुधीर रसाळ, न्या. नरेंद्र चपळगावकर, प्रा. यास्मिन शेख, रेणू दांडेकर, डॉ. सतीश बडवे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, दासू वैद्य यांनी त्यांना प्रोत्साहनदिले.
प्रा. नागेश म्हणाले की, महाविद्यालयीन स्तरावर कथा- कादंबरी अशा ललित प्रकारांच्या अंगाने मराठी शिकविले जाते; पण भाषेचा विकास म्हणून मुलांना मराठी शिकविण्यात आपण कमी पडतो आहोत. भाषेची जडणघडण, भाषा कशी तयार होते, हे शिकविले जात नाही. पाठ्यपुस्तकाच्या मागील नियमही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात नाही. सध्या इंग्रजी शाळांचा सुळसुळाट आहे. मुलांवर इंग्रजीचा भडिमार होताना मराठीची जी दुरवस्था सुरू आहे, ती थांबण्यास आता कुठेही वाव नाही, हे वारंवार जाणवते, अशी खंतही प्रा. नागेश यांनी व्यक्त केली.
मराठीच्या व्याकरणासाठी प्रा. नागेश विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करतात. तसेच ‘चला अचूक मराठी लिहू या!’ या त्यांच्या दोन भागांच्या भित्तीपत्रकावरून सोप्या भाषेत मराठीच्या नियमांची संक्षिप्त माहिती त्यांनी दिली आहे. अनेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये संदर्भ म्हणून ही भित्तीपत्रके वापरण्यात येतात. याशिवाय काही अंध विद्यार्थ्यांच्या मदतीने ते मराठी व्याकरण ब्रेल लिपीमध्ये आणण्याचा प्रयत्नही करीत आहेत.
मराठी वाचविण्यासाठी व्याकरण वाचवा साहित्याच्या दृष्टिकोनातून मराठीकडे पाहणे सोपे आहे; पण मराठीचे व्याकरण हे बौद्धिक कसरतीचे आणि वेळ घेणारे काम आहे. त्यामुळे मुलांचे व्याकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. स्पर्धा परीक्षेत मराठी विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हाच मुले मराठीच्या व्याकरणाकडे गांभीर्याने पाहतात. मराठी वाचविण्यासाठी व्याकरण वाचविणे आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे गरजेचे आहे. - प्रा. नागेश अंकुश