- राम शिनगारे
औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम विद्यापीठात मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग आहे, या विभागात विविध अभ्यासक्रमांसाठी २५० पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागात विद्यार्थी संख्या घटत असताना याच विभागाचा माजी विद्यार्थी अलिगढमध्ये मराठी भाषेचा डंका वाजविण्याचे काम करत आहे.
ही किमया औरंगाबादचे डॉ. ताहेर पठाण यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात मराठी विभागात रुजू झाल्यानंतर करून दाखविली आहे. त्यांच्या विविध प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागली आहे. २०१५ साली शून्य विद्यार्थी संख्या असलेल्या मराठी भाषा विभागात २५० पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि पीएच. डी.च्या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत.
मराठी भाषा वाचली पाहिजे, जगली पाहिजे, तिच्या संवर्धनासाठी विशेष मोहिमा राबविल्या पाहिजेत, असे सतत वाचले, ऐकले जात आहे. मात्र तिच्या संवर्धनासाठी कोणी मनातून प्रयत्न करत आहे, असे अपवादात्मक चित्र दिसते. मराठी राजभाषा असलेल्या महाराष्ट्रात विविध विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये मराठीची गळचेपी सुरूअसल्याचे चित्र आहे. आपल्याला ठिकठिकाणी आढळून येते. बाहेरच्या राज्यात मराठी भाषेचा विद्यार्थी अभ्यास करतात, संशोधन करतात यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, त्यास उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले अलिगढ मुस्लिम विद्यापीठ अपवाद ठरले आहे. या विद्यापीठातील मराठी विभागातील विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात मराठी भाषा विभागाची स्थापना १९८५ साली स्थापन झाली. या विभागातील विद्यार्थी संख्या तेव्हापासून २०१५ पर्यंत कधीच दोन आकडी अंकांच्या पलीकडे कधीच गेली नाही, अशी माहिती विभागाचे प्रमुख डॉ. ताहेर पठाण सांगतात. या विभागात डॉ. ताहेर पठाण हे ५ फेब्रुवारी २०१५ रोजी रुजू झाले. तेव्हा तर विभागात एकही विद्यार्थी नव्हता. पुढच्या शैक्षणिक वर्षात ६ विद्यार्थी जमा केले. त्यांच्यावर विभाग सुरू केला. त्यानंतर कधी मागे पाहिलेच नाही.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात उर्दू आणि हिंदी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३८ पैकी एक भारतीय भाषा शिकणे बंधनकारक आहे. याच बंधनाचा फायदा डॉ. पठाण यांनी उचलत विविध विभागांमध्ये जाऊन मराठी भाषा इतर भाषांच्या तुलनेत शिकण्यास किती सोपी आहे, हे पटवून दिले. या प्रयत्नामुळे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, एम.ए. या अभ्यासक्रमांना प्रत्येकवर्षी विद्यार्थी संख्या वाढतच आहे. २०१६ साली विभागातील विद्यार्थी संख्या १३७ वर पोहोचली. २०१७-१८ या वर्षात २७५ झाली. चालू (२०१८-१९) शैक्षणिक वर्षात ही संख्या २५० वर असल्याचेही डॉ. पठाण यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्तक्षेपामुळे वाचला विभागअलिगढ मुस्लिम विद्यापीठात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या २७५ वर पोहोचली होती. तेव्हा हा विभाग सर्वांच्या नजरेत आला. यामुळे भाषा संकुलाचे संचालक, अधिष्ठाता विरोधात गेले. कुलगुरूंचे सहकार्य मिळेना झाले. काही अभ्यासक्रम बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. २०१८-१९ च्या प्रवेशावेळी अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या. या सर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम झाला. प्रकरण केंद्रीय मनुष्यबळ विभागासह उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी यात हस्तक्षेप करत मराठी विभाग वाचविण्यासाठी मदत केली. तसेच दिल्ली ‘लोकमत’ने यासाठी मोठे पाठबळ दिल्याचे डॉ. पठाण सांगतात.
चार जणांवर चालतो विभागअलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मराठी भाषा विभागात पूर्णवेळ एकमेव डॉ. ताहेर पठाण हेच प्राध्यापक आहे. केंद्रीय विद्यापीठाच्या नियमानुसार पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळते. या विद्यार्थ्यांना अध्यापन करणे बंधनकारक असते. सध्या मराठी विभागात ३ जण पूर्णवेळ पीएच.डी.चे संशोधन करतात. डॉ. पठाण आणि हे तीन पीएच.डी.चे संशोधक असे चार जण अध्यापनाचे कार्य करत मराठी भाषा रुजविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न अलिगढ मुस्लिम विद्यापीठात रुजू झाल्यानंतर मराठी भाषेच्या विभागात विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. केली. याच काळात तासिका तत्त्वावर एका महाविद्यालयात काम केले. तेथून अलिगढ मुस्लिम विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाली.- डॉ. ताहेर पठाण, विभागप्रमुख,मराठी भाषा, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ