औरंगाबाद : मराठवाड्यात मागील पाच वर्षांत पावसाळ्यात होणाऱ्या विविध अपघाती घटनांमध्ये ३६९ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये पूर, दरड कोसळणे, वीज पडून झालेल्या अपघाती घटनांचा समावेश आहे. पावसाळा सुरू झाला असून विभागीय प्रशासनाने सर्व जिल्हा प्रशासनांना मान्सूनच्या अनुषंगाने घ्याव्या लागणाऱ्या खबरदारीबाबत सूचना केल्या आहेत.
२०१५ मध्ये पुरात वाहून १७, वीज पडून ६९, भिंत पडून १ अशा ८७ जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये ४३ जणांचा पुराने बळी घेतला, तर वीज आणि भिंत पडून ४४ जण दगावले. ८७ जणांचा बळी त्या वर्षी गेला. २०१७ मध्ये विभागात ८१ जणांचा बळी वरील अपघातांमध्ये गेला. २०१८ मध्ये सर्व घटनांमध्ये ३७ जणांचा बळी गेला. २०१९ साली ३५ जणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. दरड कोसळून दोघांचा, तर ३३ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. भिंत कोसळून व इतर अपघातांमध्ये ७ जण दगावण्यासह ७७ जणांचा मृत्यू २०१९ मध्ये झाला.
१५७२ गावांसाठी सज्जतेचे निर्देशयेणाऱ्या पावसाळ्यात नदीकाठच्या गावांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठच्या १५७२ गावांमध्ये प्राधान्याने विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी, असे आदेश मंगळवारी विभागीय प्रशासनाने सर्व जिल्हा प्रशासनांना दिले आहेत.