औरंगाबाद : बीड, जालना, औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यांत ७० टक्के रबी पीकपेरणी पूर्ण झाली आहे. त्यात बीड जिल्ह्यात ९६ टक्के पेरणी झाली असून, जालना जिल्ह्यात ६३ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात ४२ टक्के पेरणी झाल्याची नोंद विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात झाली आहे.
६ लाख ६४ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ लाख ६६ हजार ८५० हेक्टरवर रबी तृणधान्य, कडधान्ये, गळीत धान्याची ७० टक्के लागवड पूर्ण झाली असून, पेरणीत बीड जिल्हा अव्वल असून, औरंगाबाद पिछाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.जालना जिल्ह्यात रबी ज्वारी ५२ हजार १९४, गहू १८ हजार ३५३, मका ५ हजार ३१२, हरभरा ३३ हजार २५२ हेक्टरवर पेरणी झाली. बीड जिल्ह्यात रबी ज्वारी १ लाख ४३ हजार ७१७, गहू १९ हजार ५२८, मका २ हजार २८२, हरभरा १ लाख ४ हजार ७६ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यात रबी ज्वारी २३ हजार ३११, गहू ३० हजार २३, मका १३ हजार ९५१, हरभरा १९ हजार ५६८ हेक्टरवर लागवड झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यात रबीचे सरासरी २ लाख ८ हजारपैकी ८७ हजार २६३ हेक्टर, जालना जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ३६८ पैकी १ लाख ९ हजार ७७१ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात २ लाख ८१ हजार ४८० हेक्टरपैकी २ लाख ६९ हजार ८१६ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली. बीडमध्ये अनुक्रमे रबी ज्वारी, हरभरा, गव्हाच्या क्षेत्रावर, जालना जिल्ह्यातही बीड सारखेच प्रमाण असून, औरंगाबादमध्ये गहू, हरभऱ्याची पेरणी अधिक असून, मक्याचे क्षेत्र सरासरीच्या दीडपट वाढले आहे.