औरंगाबाद : उद्योजक- व्यापारी यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खाजगी बँकेकडून एका उद्योजकाची होणारी लूट थांबविण्यात यश आले आहे. त्या उद्योजकाला दंड रूपात लावलेले २० लाख रुपयांची नोटीस बँकेला मागे घ्यावी लागली, शिवाय खाते दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करण्यासाठी मंजुरी दिली.
येथील एक उद्योजक सिक्युरिटी सेवा पुरवतात. टेंडर भरण्यासाठी बँक गॅरंटी आवश्यक असते. बँक गॅरंटी वेळेवर मिळाली नाही, तर टेंडर प्रक्रियेतून बाद केले जाते. त्यासाठी त्या उद्योजकाने एका खाजगी बँकेत आपले खाते उघडले होते. त्या खात्यातून कोट्यवधींची उलाढाल होत असत. ‘ओडी’ व ‘सीसी’ सेवेसाठी बँक ११.३४ टक्के व्याजदर आकारत होती. एवढेच नव्हे तर अनेकदा टेंडरच्यावेळी त्या बँकेने गॅरंटी देण्यास उशीर लावला. यामुळे त्या उद्योजकाचे मोठे नुकसान झाले होते. दुसऱ्या बँका ८.४ टक्के व्याजदर घेत असताना ही बँक ११.३४ टक्के व्याजदर आकारते, प्रोसेसिंग फी जास्त आकारली जाते, वेळेवर बँक गॅरंटी मिळत नसल्याने त्या उद्योजकाने कंटाळून त्या खाजगी बँकेतून खाते काढून राष्ट्रीयकृत बँकेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथेही बँकेने त्यांची अडवणूक केली. अखेर त्या उद्योजकाने मराठवाडा चेंबरकडे धाव घेतली.
चेंबरचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी अन्य बँकेचे अधिकारी व सीए यांचा सल्ला घेतला; तसेच अभ्यास करून बँकेचे रिलेशनशीप ऑफिसरची भेट घेतली; पण त्याचा फायदा झाला नाही. अखेर चेंबरच्या अध्यक्षांसह महासचिव जगन्नाथ काळे, सहसचिव लक्ष्मीनारायण राठी व कोषाध्यक्ष विकास साहुजी यांच्या शिष्टमंडळाने १८ सप्टेंबरला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. त्यांनी लगेच त्या खाजगी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना फोन लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. थेट केंद्रीय राज्य मंत्र्यांचे आदेश येताच बँकेचे व्यवस्थापन खडबडून जागे झाले. त्यांनी अकाउंट क्लोजर चार्जेस व अन्य चार्जेस मिळून चुकीचा लावलेला २० लाखाचा दंड रद्द केला. ३ नोव्हेंबर रोजी बँक खाते दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करण्याची मंजुरी दिली.
बँकेसंदर्भात तक्रारी कराखाजगी बँकांकडून उद्योजक व व्यापाऱ्यांनी मोठी लूट सुरू आहे. याविरोधात मराठवाडा चेंबर सक्रिय झाले असून, पहिली केस जिंकली आहे. अशी मोठी समस्या निर्माण झाली असेल, तर त्या संबंधित बँकेविरोधातील पुरावे उद्योजक व व्यापाऱ्यांनी मराठवाडा चेंबरच्या कार्यालयात आणून द्यावेत. त्यावर अभ्यास करून बँकेकडून न्याय मिळवून देण्यात येईल.- आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स