औरंगाबाद : खरिपाच्या पेरणीचा पहिला महिना संपत आला असून, मराठवाड्यात १६ लाख ५३ हजार २०० हेक्टर (३३.६६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात ५३.६२ टक्के पेरणी करून नांदेड जिल्हा आघाडीवर असून सर्वात कमी २३.११ टक्के पेरणी उस्मानाबाद जिल्ह्यात झाली आहे. यंदा सर्वाधिक ५९.१४ टक्के पेरणी सोयाबीनची झाली तर कपाशीची ३७.१९ टक्के झाली आहे.
जोरदार सलामी देणारा पाऊस मध्यंतरी गायब झाला. यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा वरुणराजाचे आगमन झाल्याने पेरणीने जोर धरला आहे. मराठवाड्यात ४९,१०,९०० हेक्टरपैकी १६,५३,२०० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीत नांदेड जिल्हा नंबर वन राहिला. हिंगोली जिल्ह्यात ५३.२२ टक्के, औरंगाबाद ३२.९२ टक्के, बीड २९.०० टक्के, परभणी २८.३४ टक्के, जालना २३.५८ टक्के, लातूर २३.७३ टक्के पेरणी पूर्ण झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात २३.११ टक्के पेरणी झाली.
पेरणीमध्ये जालना, लातूर व उस्मानाबाद पिछाडले आहेत. १०,३८,८०० हेक्टरपैकी ६,१४,३०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यातही नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यांत सोयाबीनची पेरणी अधिक आहे. तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात ५१०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील वर्षी शेंद्री बोंडअळीच्या उद्रेकाने झालेले मोठे नुकसान लक्षात घेता यंदा शेतकरी कापूस कमी प्रमाणात लावतील, असा अंदाज कृषी विभागाने खरीप हंगाम बैठकीत व्यक्त केला होता. मात्र, नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांचा ओढा कपाशीकडेच असल्याचे आतापर्यंतच्या पेरणीवरून दिसते आहे. मराठवाड्यात १७,१७,४०० हेक्टरपैकी ६,३८,७०० हेक्टरवर (३७.१९ टक्के) कपाशीची लागवड झाली आहे. त्यातही लातूर विभागात ३७.१९ टक्के तर औरंगाबाद विभागात ३२.३९ टक्के कापसाची लागवड झाली आहे. पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पेरणी १०० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
ढगाळ वातावरण, तुरळक-मध्यम पाऊस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, मराठवाड्यात १ जुलैपर्यंत ढगाळ वातावरण राहील. काही भागात तुरळक व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. ७५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला असल्यास, जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून पिकाची पेरणी करावी.