छत्रपती संभाजीनगर: शहरातील महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त तथा जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे आज सकाळी ११. ४५ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. प्राचार्य बोराडे यांचे मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने मराठवाड्याचे शैक्षणिक नेतृत्व हरवलं आहे.
प्राचार्य बोराडे यांच्या निधनाने रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनानंतर मराठवाड्यावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळल्याच्या भावना अनेकांनी सोशल मीडियातून व्यक्त केल्या आहेत. प्राचार्य बोराडे यांनी मराठवाडासाहित्य परिषदेने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला होता. शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात प्राचार्य बोराडे यांचे योगदान अमुल्य आहे. त्यांचे पार्थिव जेएनईसी महाविद्यालयात दुपारी ३ ते ५ या वेळेत दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. अंत्यविधी आज सायंकाळी ७ वाजता एमजीएम स्टेडियम येथे होणार आहे.
कुशल, कर्तबगार शैक्षणिक नेतृत्व हरपलं ..! एमजीएम विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी प्राचार्य बोराडे यांच्या निधनावर कुशल, कर्तबगार शैक्षणिक नेतृत्व हरपलं, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मराठवाडा उद्योजक संघटनेचे कर्ताधर्ता, एसेम जोशी व डॉ. बापू काळदाते यांचे शिष्य, अतिशय शिस्तबध्द प्राचार्य, औरंगाबादचे “सार्वजनिक काका” , कुशल संघटक , सांस्कृतिक व प्रेरक संवेदनशील अस्सल माणूस , एमजीएमच्या पहिल्या महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य . उत्कृष्ट अभ्यासक. विनम्र आदरांजली ..!
शरद पवार यांनी व्यक्त केला शोकप्राचार्य प्रताप बोराडे यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियात पोस्टद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ''ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त,विद्या प्रतिष्ठान,बारामतीचे माजी प्रशासकीय अधिकारी, ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आज दुःखद निधन झाल्याची बातमी समजली. मागील पाच दशके प्रतापरावांचा आणि माझा स्नेह होता.जगभरात एखादा देश क्वचितच आढळेल जिथे त्यांचा विद्यार्थी सापडणार नाही.आपल्या ज्ञानदानाने व उत्तम प्रशासकीय कौशल्याने त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था नावारूपास आणल्या.राज्यातील अनेक परिवर्तनवादी संघटना व संस्था यांच्यासोबत त्यांचा संवाद होता.मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते आग्रही होते.आज त्यांच्या निधनाची बातमी ही मला वैयक्तिक वेदनादायी आहे.त्यांच्या कुटुबियांना व एमजीएम परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. प्रतापरावांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन !''