औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी बिगुल वाजला आहे. कोरोनामुळे रेंगाळलेल्या या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. मराठवाड्यात आचारसंहिता २ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपासून लागू झाली आहे.
मराठवाड्यात पदवीधर निवडणुकीसाठी सुमारे ३ लाख ५२ हजारांवर मतदार नोंदणी गेली आहे. यावेळी १२ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असल्याचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी बिगुल वाजला आहे. मतमोजणी केंद्र अजून ठरलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा आणि प्रचार करण्यासाठी नियम आणि अटी आहेत. कोरोनाचा प्रोटोकॉल सर्व राजकीय पक्षांना पाळावा लागणार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना मतदान करण्याबाबत अजून सूचना आलेल्या नाहीत. मतमोजणी केंद्र आणि मतदार केंद्र यासाठी आयोगाकडे परवानगी मागितली आहे.
यामुळे लागणार जास्तीचा खर्च मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे ऑक्सिजन प्रमाण तपासावे लागेल. मतपत्रिका देण्यापूर्वी मतदारांना हॅण्डग्लोज द्यावे लागतील. थर्मलगनद्वारे मतदारांचे तापमान तपासावे लागेल. मतदारांना सोशल डिस्टन्सिंगने मतदानासाठी उभे करावे लागेल. मतदान केंद्रावर कर्मचारी प्रशिक्षण देण्यासाठी खर्च लागेल. मतदान केंद्र वाढवावे लागतील. त्यामुळे खर्च वाढेल. तसेच पीपीई कीट प्रत्येक केंद्रावरील कर्मचाऱ्याला द्यावी लागेल. सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. मतपत्रिका सॅनिटाईज करून छापाव्या लागतील. केंद्रावर कर्मचारी नेण्यासाठी वाहनांची संख्या वाढवावी लागेल. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी इतर प्रशासकीय खर्चही लागेल.
असा आहे निवडणूक कार्यक्रमकोरोनामुळे रेंगाळलेल्या या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. आचारसंहिता २ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपासून लागू झाली आहे. ५ नोव्हेंबरला निवडणूक अधिसूचना निघेल. १२ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना अर्ज भरणे शक्य होईल, १३ नोव्हेबर रोजी अर्ज छाननी केली जाईल. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ७ डिसेंबरपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक अनुषंगाने विभागातील मतदान केंद्र व सहायकारी मतदान केंद्रासह ८१३ मतदान केंद्रांचे ठिकाण, मतदान केंद्र स्थित असलेल्या इमारतीचे नाव, मतदान केंद्राची व्याप्ती निश्चित करण्यात आलेली आहे. विभागात साडेतीन लाख मतदार आहेत.