औरंगाबाद : राज्यात मराठवाडा लसीकरणात पिछाडीवर आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविणे गरजेचे आहे. जास्तीतजास्त लोकांना लसीकरण करून दोन्ही डोस कसे देता येतील, यासाठी लसीकरणाची गती वाढवा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती आणि आरोग्य सचिवांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये केल्या. ओमायक्रॉनच्या अनुषंगाने विभागाची काय तयारी आहे, याचा आढावाही या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला.
आरटीपीसीआरच्या चाचण्या वाढवाव्यात आणि कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांच्या मदतीचे अर्ज लोकांकडून भरून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या बैठकीला ऑनलाइन बैठकीला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महसूल उपायुक्त पराग सोमण, उपायुक्त शिवाजी शिवाजी शिंदे, उपायुक्त जगदीश मणियार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त संजय काळे आदींची उपस्थिती होती.
राज्याच्या तुलनेत मराठवाडा लसीकरणात पिछाडीवर आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्यासाठी जनजागृतीतून उपाययोजना करण्याच्या सूचना सचिवांनी दिल्या. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्याबाबत फारसे अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये याबाबत माहिती देऊन प्रत्येकाला हे अनुदान मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना सचिवांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.